पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
१५
 

“ युधिष्ठिरा, सत्य भाषण करणे हेच उत्तम होय. कारण सत्याहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही. तथापि, हे भारता, याविषयीच जे ज्ञान होणे अवश्य आहे ते मी तुला सांगतो, ऐक. ज्या प्रसंगी सत्याचा असत्यासारखा उपयोग होत असेल व असत्याची योग्यता सत्यासारखी असेल त्याप्रसंगी, जरी सत्य असले तरी ते न बोलता असत्यच भाषण केले पाहिजे. ज्याला सत्य कोणते याविषयीचा निर्णय झालेला नाही, तो मनुष्य केवळ अज्ञानी होय. सत्य व असत्य या दोहोंविषयीचा सिद्धांत ठरविल्यानेच मनुष्य धर्मज्ञ होतो. सत्यभाषणरूप धर्म घडावा म्हणून कौशिक नावाच्या एका तापसाने चोरट्या लोकांना त्यांच्या भीतीने लोक कोणत्या दिशेने पळून गेले होते ते सांगितले. असला हा पुरुष खरा धर्मवेत्ता नव्हे. कारण त्याच्या सत्य भाषणामुळे अनेक लोकांचा घात झाला. हा प्रश्न असा आहे की, यात धर्म कोणता व अधर्म कोणता याची निवड करणे कठीण आहे; याविषयी निश्चय कसा करावा ? अर्थात हे ठरविणे अशक्य आहे. तथापि, लोकांच्या अभ्युदयासाठीच धर्म सांगितलेला आहे. ह्यामुळे ज्याच्या योगाने लोकांचा अत्यंत उत्कर्ष होईल तोच धर्म होय, असा सिद्धांत आहे. धर्म शब्दाचा अर्थ धारण करणे असा आहे. सर्व लोकांना धर्माचेच अवलंबन असल्यामुळे धर्मानेच त्यांना धारण केले आहे. म्हणूनच ज्याच्या योगाने लोकांचे धारण होईल तो धर्म, असा सिद्धांत आहे." (शांति. १०९). धर्म हे साध्य नव्हे साधन आहे असे विचार भीमानेही सांगितले आहेत. अरण्यात असताना तो एकदा युधिष्ठिराला म्हणाला, "हे भरतवंशजा, आम्ही तुझे शास्त्र ऐकत बसलो आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांना त्याच वेळी ठार केले नाही या दुष्कृत्यामुळे आम्हांला ताप भोगावा लागत आहे. हे राजा, तू