पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

'धर्म धर्म' म्हणत सदैव व्रते करीत बसला आहेस. तुला स्वतःला प्राप्त झालेल्या या वनवासरूपी पशुवृत्तीकडे तरी लक्ष दे. या वृत्तीचे अवलंबन समर्थ लोक करीत नाहीत, दुबळे लोक करतात. ऐश्वर्य संपादन करण्यास असमर्थ असणारे निंद्य लोकच स्वर्गाचा विघात करणाऱ्या या वैराग्यावर प्रेम करतात. राजा जो धर्म मित्रांच्या आणि आपल्याही अपकर्षास कारण होतो तो धर्म नसून प्रत्यक्ष दुःख अथवा अधर्माचे बीज होय. मनुष्य सदोदित इतर पुरुषार्थांचा त्याग करून धर्माचरण करू लागला म्हणजे तो, धर्म अर्थसाध्य असल्यामुळे, धर्माचरणाविषयी असमर्थ बनतो आणि असे झाले म्हणजे धर्म व अर्थ हे दोन्ही पुरुषार्थ त्या पुरुषाचा त्याग करतात. ज्याचा धर्म केवळ धर्माकरताच आहे तो शहाणा नव्हे. त्याच्या कपाळी नेहमी दुःखच येणार." (वन.अ. ३३) यावर युधिष्ठिराने नेहमीप्रमाणे, 'मला सत्यापेक्षा काही श्रेष्ठ चाटत नाही.' असेच उत्तर दिले. दुसऱ्या एका प्रसंगी सात्यकीलाही त्याने, 'तू म्हणतोस त्याप्रमाणे खरे असले तरी मला सत्यव्रताचे अत्यंत पालन करावयाचे आहे, राज्याचे करावयाचे नाही' असे उत्तर दिले व यादववीर दुर्योधनाला ठार मारण्यास उद्युक्त झाले असता, तुम्ही धर्मामध्ये केव्हाही प्रमाद होऊ देऊ नका.' असे त्यांना विनविले. (वन.अ. १२०).
 अशा तऱ्हेने तो निक्षून बोलत असला तरी त्याच्या मनातही पुष्कळ वेळा डळमळ चालत असे. आपली दीन स्थिती ध्यानात येऊन, आपल्या प्रिय पत्नीची वनवासात चाललेली विटंबना पाहून त्याचे मन चलित होई व आपल्या 'सत्याकरिता सत्य' या व्रतात कितपत अर्थ आहे अशा शंकेने त्याचेही मन ग्रस्त होत असे व मग आपल्याला यात कोणी तरी पाठिंबा द्यावा असे त्याला