पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
१७
 

वाटू लागे. म्हणून एके प्रसंगी त्याने लोमश ऋषींना ते अरण्यात भेटावयास आले असता प्रश्न केला. तो म्हणाला, 'हे देवर्षिश्रेष्ठा, माझ्या अंगी मुळीच गुण नाहीत असे वाटत नाही. तथापि, दुसरा कोणीही राजा दुःखसंतप्त नसेल इतका मी दुःखाने गांजलो आहे. आणि आमचे शत्रू दुर्गुणी आहेत इतकेच नव्हे तर ते धर्माप्रमाणे वागतही नाहीत, असे मला वाटते; तरी पण हे लोमशा त्यांची या जगतामध्ये भरभराट होते, ह्याचे कारण काय ?' (वन.अ. ९४).
 युधिष्ठिराच्या या प्रश्नावरून धर्माचरणामुळे अभ्युदय झाला पाहिजे आणि आपला तसा होत नाही हे विपरीत आहे, असे त्यास वाटत होते, हे निश्चित दिसते. अभ्युदय होतो असे दिसत नसले तर लगेच धर्म सोडावा असे त्याने केले नाही हे खरे; पण हे काही तरी चुकत आहे असे त्यासही वाटत होते असे दिसून येते. युधिष्ठिराच्या प्रश्नाला देवर्षी लोमश यांनी जे उत्तर दिले त्यावरून धर्म हे साधन आहे व समाजाच्या उत्कर्षासाठीच त्याची उत्पत्ती आहे हे त्यांनाही मान्य होते, असे दिसून येईल. थोडा वेळ फलप्राती दिसेनाशी झाली तर लगेच धर्म सोडू नये. एवढी सूचना त्यांनी केली आहे इतकेच. लोमश म्हणाले, 'हे कुंतीपुत्रा, अधर्माच्या योगाने प्रथम काही काळ मनुष्याचा अभ्युदय होतो. नंतर थोडा वेळ त्यास आपले कल्याणही झालेले पाहावयास सापडते. पुढे तो शत्रूसही जिंकतो. पण शेवटी मात्र समूळ नष्ट होऊन जातो. उलट धर्माचरणी मनुष्य प्रारंभी जरी कष्ट भोगत असला तरी अंती त्याला सुख प्रात होते.'
 धर्माधर्मासंबंधी धर्मव्याधानेही असेच विचार एके ठिकाणी सांगितलेले आढळतात. आपल्याकडे आलेल्या ब्राह्मणाला धर्म
 २.