पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

व्याध म्हणाला, ‘धर्मांचे ज्ञान अत्यंत सूक्ष्म असून त्याच्या अपार अशा अनेक शाखा आहेत. प्राणांतिक प्रसंगी व विवाहाच्या ठिकाणी असत्य भाषण करणे भाग पडते. त्या वेळी असत्य भाषण केल्यानेच सत्य भाषण केल्याचे व सत्य भाषण केल्याने असत्य भाषण केल्याचे फळ मिळते. कारण जे प्राण्यांना अत्यंत हितकारक असेल तेच सत्य होय असा निश्चय आहे. यद्भूतहितमत्यंतं तत् सत्यमितिधारणा ॥' (वन.अ. २०९.४ )
 धर्म हे साधन आहे, साध्य नव्हे आणि समाजाच्या उत्कर्षासाठी त्याची प्रवृत्ती झालेली आहे असा जो भारती सिद्धांत तो अनेकांच्या मुखाने वर सांगितलाच आहे. आता श्रीकृष्णाने हाच विचार कसा विशद करून दाखविला आहे ते सांगतो.
 भारतीयुद्ध चालू असताना एकदा युधिष्ठिराला कर्णाने बाणांचा वर्षाव करून अगदी घायाळ करून टाकले व त्यामुळे त्याला रणातून पळून शिबिराकडे यावे लागले. ही बातमी ऐकून अर्जुनाला चिंता वाटू लागली व युधिष्ठिराचे कुशल विचारण्यासाठी तो रणांगण सोडून शिबिरात आला. धर्मराज कर्णावर अगदी चिडून गेला होता व त्याच्या सूडासाठी जळत होता. अर्जुन त्याला मारून शिबिरात आला असेल असे वाटून तो त्याचे अभिनंदन करू लागला. पण तसे झालेले नाही, कर्ण अजून जिवंतच आहे असे त्याला कळल्यावर निराशेने त्याचे मन भडकून गेले व त्याने अर्जुनाची अतिशय निर्भर्सना केली व 'तुझ्या हातून पराक्रम होत नाही तर तुझे धनुष्य ठेवलेस कशाला, ते दुसऱ्याला देऊन का टाकीत नाहीस !' असे तो म्हणाला. 'तुझे धनुष्य दुसऱ्याला देऊन टाक' असे मला कोणी म्हटल्यास त्या पुरुषाचा मी तत्काल वध करीन' अशी अर्जुनाने पूर्वी केव्हा तरी प्रतिज्ञा केली होती.