पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
१९
 

त्यामुळे युधिष्ठिराने तसे म्हणताच हा आपला ज्येष्ठ बंधू आहे, आपल्याला वंद्य आहे हा विचार मनात न आणता अर्जुनाने एकदम खड्ग काढले व तो त्याच्या वधास उद्युक्त झाला. हे त्याचे वर्तन पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले व अर्जुनाने आपल्या प्रतिज्ञेचे कारण सांगितले तेव्हा तर त्यांना प्रतिज्ञापालनासंबंधीची त्याची ही विपरीत कल्पना व धर्माधर्मासंबंधीचे अज्ञान पाहून परम उद्वेग वाटला. ते त्याला म्हणाले, 'अर्जुना, तू मूर्खासारखा धर्मलोपभयाने जे कृत्य करण्यास उद्युक्त झाला आहेस ते धर्माची सूक्ष्म तत्त्वे माहीत असलेला पुरुष कधीच करणार नाही. पार्था, कार्याकार्यनिर्णयासंबंधाने पंडितांचे जे सिद्धांत आहेत त्यांचे ज्ञान ज्याला नाही तो पुरुष असाच तुझ्याप्रमाणे भांबावून जाऊन वेड्यासारखी भलतीच गोष्ट करण्यास तयार होतो. तू धर्मज्ञ म्हणून जे कृत्य करण्यास तयार झाला आहेस ते केवळ तुझ्या अज्ञानाचेच द्योतक आहे. बाबारे, धर्माची तत्त्वे फार सूक्ष्म आहेत. ती तुला माहीत नाहीत. आता मी तुला धर्माचे गूढ तत्त्व निरूपण करून सांगतो, सत्यापेक्षा अधिक श्रेष्ठ काही नाही हे खरे, परंतु सत्यास अनुसरून वर्तन करीत असताना सत्याच्या तत्त्वावर अनुसंधान ठेवून त्याचा यथायोग्य निर्णय ठरविणे अवघड आहे. अज्ञ पुरुष सत्यासत्य विवेकातील मर्म न जागता केवळ सत्यालाच धरून बसतात आणि तदनुसार वागतात. पण सत्यासत्याचे मर्म ज्याला कळेल तोच धर्मज्ञ होय. धर्माचे मूलतत्त्व प्राण्यांचा उत्कर्ष व्हावा हेच होय. आणि याच तत्त्वाच्या अनुरोधाने श्रुतीत धर्माची व्याख्या केली आहे. या अनुरोधाने पाहिले तर अर्जुना, आधी तू जी प्रतिज्ञा केलीस तीच चुकीची आहे. आणि म्हणून तू मूर्खपणाने अधर्ममूलक कर्म करीत आहेस, यात संदेह नाही. प्राणसंकटात,