पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

विवाहकाली, किंवा सर्व जातीचा नाश होण्याचा प्रसंग आला असताना असत्य भाषण केले तरी पाप लागत नाही. धर्मतत्त्व यथार्थ जाणणाऱ्या लोकांना यात अधर्म वाटतच नाही.' (कर्णपर्व, अ. ६९).
{{gap}धर्माचे स्वरूप काय, त्याची प्रवृत्ती कशासाठी झाली आहे या महत्त्वाच्या विषयासंबंधी वर अनेक थोर व विचारी पुरुषांची मते सांगितली आहेत. भीम, लोमश, धर्मव्याध यांची मते यात आहेतच, पण त्याशिवाय पितामह भीष्म आणि योगेश्वर श्रीकृष्ण यांचाहि अभिप्राय व्यक्त केला आहे. त्यावरून धर्माचे अंतिम ध्येय समाजाचा उत्कर्ष हे असून सत्यासत्य, न्याय्यअन्याय्य हे सर्व त्यावरून ठरविणे अवश्य आहे असा भारतीय तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धांत ठरतो असे स्पष्ट दिसून येईल.

धर्म परिवर्तनीय

 ज्यामुळे समाजाचा किंवा राष्ट्राचा उत्कर्ष होतो ते बंधन म्हणजे धर्म होय अशी व्याख्या पतकरिली म्हणजे ही बंधने सर्व काळी सर्व स्थळी एकाच प्रकारची असणे शक्य नाही हा विचार मान्य करणे प्राप्तच आहे. आणि महाभारतातील प्रज्ञावंतांनी हा विचार अनेक ठिकाणी विस्तरशः मांडलेला आढळून येतो. व्यासांनी एके ठिकाणी हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 'कृतयुगातील धर्म निराळा, त्रेता, द्वापर, कली याही युगांतील धर्म निराळे;' असे ते म्हणतात. यात हाच अभिप्राय आहे. मोक्षधर्माचे सिद्धांत जरी शाश्वत असले तरी जे प्रपंचाचे, संसारधर्माचे तत्त्वज्ञान येथे सांगावयाचे आहे, त्याचे सिद्धांत त्रिकालाबाधित असणे शक्य नाही हे उघड आहे. काल हा नित्य पालटत असतो. परिस्थिती