पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
२१
 

पालटत असते. त्या त्या परिस्थितीप्रमाणे समाजावरची बंधने बदलणे अवश्य आहे हा विचार कोणाही सुज्ञ पुरुषाला पटण्याजोगा आहे. भारतकारांच्या मते तर राजा हाच कालाचे कारण आहे. राजा हाच आपल्या उत्तम किंवा अधम शासनाने कृत, त्रेता, द्वापर, कली इत्यादी युगे निर्माण करतो असे महाभारतात दोन तीन ठिकाणी म्हटले आहे. (शां. ६९, ९१) सध्या प्रचलित असलेली सर्वस्वी कालावलंबी युगकल्पना भारतात आहे. पण ही वर सांगितलेली कल्पनाही आपणांस तेथे आढळते. यावरून ठरीव कृत युग किंवा कलियुग असे काही नसून राजा येईल तसे युग पालटते असा विचार स्पष्ट होतो; आणि तो जमेस धरून देशकालाप्रमाणे धर्म पालटतो असा निश्चय भारतकारांनी केला आहे.

स एव धर्मः सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठितः
आदानमनृतं हिंसा धर्मोह्यावस्थिकः स्मृतः ।

-शां. ३६:११

 योग्य वेळी आणि योग्य स्थळी जो धर्म ठरतो तोच अयोग्य वेळी आणि अयोग्य स्थळी अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्य भाषण, हिंसा या सर्वांची गोष्ट अशीच आहे. म्हणून 'धर्म हा परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो' असे भीष्मांनी येथे सांगितले आहे. युद्धामध्ये आपण फार हिंसा केली, अनेक भूपतींचा वध केला या विचाराने युधिष्ठिराला फार खंत वाटू लागली. या पापाच्या निष्कृतीसाठी वनात जाऊन तपश्चर्या करणे अवश्य आहे असे वाटून तो राज्यत्यागाची भाषा बोलू लागला. तेव्हा भीष्मांनी त्याला उपदेश करून, तुझ्या हातून पाप घडलेलेच नाही, असे सांगितले. अहिंसा हा काही सर्व स्थळी धर्म होत