पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

नाही, असे सांगताना ते म्हणाले, 'धर्माचा उच्छेद टळत असेल. राष्ट्र सुखी होत असेल तर अशा प्रसंगी वध करणे हे सद्वर्तनाला बाधक होत नाही. कारण, हे प्रजाधिपते, एखादे अधर्माचे कृत्य हेच केव्हा धर्म होत असते व धर्माचे कृत्यही अधर्मरूपी होत असते. तेव्हा तू शोक करू नको. अंतःकरण स्थिर कर.' (शांति. ३३) दुसऱ्या एका प्रसंगी भीष्मांनीच पुढीलप्रमाणे उद्गार काढले आहेत. 'आपत्ती आली असताना पूर्वीच्या लोकांनी आचरण केलेल्या गौण धर्माचेही आचरण करावे. कारण हे भारता, संपन्नतेच्या कालाचे धर्म निराळे आहेत व आपत्कालचे धर्म निराळे आहेत. द्रव्यसंग्रह केल्यावाचूनही धर्म संपादन करता येईल, पण चरितार्थाचे महत्त्व धर्माहूनही अधिक आहे. ज्या उपायाने धर्मनिष्ठ राहूनही बलाची प्राप्ती होईल असा खात्रीचा उपाय नाही. म्हणूनच आपत्काली अधर्मालाही धर्माचे स्वरूप येते व धर्मही अधर्म होतो असे ज्ञानी लोकांचे मत आहे.'
 आपल्या इतर प्राचीन ग्रंथांप्रमाणे महाभारतातही आपद्धर्म म्हणून एक मोठेच प्रकरण आहे. समाजाला नेहमीच्या व्यवस्थेसाठी काही बंधने लावून दिलेली असतात. पण आपत्काल आला असता ती बंधने पाळणे हे अशक्य असते. अशा वेळी ती बंधने सोडून त्या त्या प्रसंगी आपले व समाजाचे ज्यायोगे हित होईल ते कोणतेही आचरण धर्म्यच होय असा भारतकारांनी अभिप्राय दिलेला आहे. वर्णधर्म ही प्राचीनकालची फार महत्त्वाची कल्पना होय. पण आपत्काली ती व्यवस्थाही बदलण्यास हरकत नाही, नव्हे अवश्य बदलावी असा भारतात उपदेश आहे. युधिष्ठिर म्हणतो की, "सरळ मार्ग म्हणजे श्रुतींनी लावून दिलेली कामे चारहि वर्णांनी करणे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांचा धर्म अध्ययनादि,