पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
२३
 

क्षत्रियांचा शौर्यादि, वैश्यांचा कृष्यादि, आणि शूद्रांचा सेवादि. असे जरी खरे तरी जगातून कधीही नाहीसे न होणारे धर्म आणि अधर्म हे त्याच कर्माच्या ठायी संभवतात. उदा. ब्राह्मणाने क्रयविक्रय करणे हा संकट नसता अधर्म होय, परंतु निर्वाहच होत नसेल तर आपत्काली तोच त्याला धर्म होय. या रीतीने परस्पर वर्णांच्या क्रियांचा विपर्यास होतो व स्थितीभेदाने तीच धर्म रूपवती क्रिया अधर्मरूप मानिली जाते. संजया, उपजीविकेचे साधन असूनही आपद्धर्माप्रमाणे चालणारा, आणि आपत्तीत असूनही आपद्धर्माप्रमाणे न चालणारा हे दोघेही निंदेला पात्र आहेत, आम्ही पूर्वी एकचक्रा नगरीत भिक्षा मागितली. तेव्हा भिक्षा न मागणे हा अधर्म होता. पण आता युद्ध सोडून भिक्षा मागणे हा अधर्म होईल, " (उद्योग २८)
 साधारणतः शस्त्रग्रहण करून प्रजेचे पालन करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. पण राज्यावर संकट आले व राजाच्या हातून ते निवारण होईनासे झाले किंवा राजा नादान असल्यामुळे प्रजेच्या पालन होत नसले तर वर्णधर्माची कोणचीही कल्पना मनातं न आणता सर्वांनी क्षात्रधर्माचे आचरण करावे असा उपदेश भीष्मांनी केला आहे. ते म्हणतात, 'अपार आणि नौकाशून्य अशा संकटरूप समुद्रामध्ये जो मूर्तिमंत परतीर अथवा नौकाच झालेला असतो तो जरी शूद्र असला, अथवा दुसरा कोणी असला तरी त्याचा सर्वथैव सन्मान करणेच योग्य होय. प्रजापालन न करणारा राजा अगदी निरर्थक होय. जो सदैव सज्जनांचे रक्षण करून दुष्टांना हाकून देतो तोच (शूद्र असला तरी) राजा केला पाहिजे. हा देश व काल यांचा प्रभावच असा आहे की, या कारणांच्या अनुरोधाने धर्मालाही अधर्माचे रूप येते व अधर्मही धर्मस्वरूप बनतो.' (शांति ७८)