पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 आपत्काली अमुक करावे व एरवी अमुक करावे या बोलण्याचा 'परिस्थिती पाहून वर्तावे' असाच अर्थ होतो. कारण आपत्काल म्हणजे अमका एक काल असे काहीच ठरलेले नाही. उपजीविका चालली नाही तरी आपत्कालच होय. परचक्र येणे, राजा नादान असणे, अवर्षण होणे, हे सर्व आपत्कालच होत. यावरून प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा, गावाचा किंवा समाजाचा आपत्काल निराळा असू शकेल हेही दिसते. वर सांगितलेले आपत्काल हे नेहमी येथे ना तेथे असणारच आणि त्यामुळेच आपत्काली असे आचरण करावे याचा अर्थ देश, काल, परिस्थितीप्रमाणे आचरण करावे, उत्कर्ष कसा होईल इकडे लक्ष ठेवावे; सत्य, अहिंसा, दया, क्षमा, प्रतिज्ञापालन यासंबंधीच्या एकाच सिद्धांताला चिकटून बसू नये. 'असाच अभिप्राय व्यक्त होतो.
 भिन्न युगात धर्मनियम निराळे, समर्थ असताना निराळे, दुबळे असताना निराळे, सुस्थितीत असताना निराळे, आपत्तीत असताना निराळे. हे सर्व विचार एकत्र केले की धर्मनियम हे परिवर्तनीय आहेत, शाश्वत नाहीत असाच भारतकारांचा अभिप्राय आहे हे निश्चित दिसू लागते.
 श्रीकृष्णाचे या विषयासंबंधी निश्चित व उत्तम मत सांगून हा विषय पुरा करू.
 'तुझे धनुष्य दुसऱ्यास देऊन टाक' असे युधिष्ठिर म्हणाला तेव्हा अर्जुन त्याच्या वधास उद्युक्त झाला हा कथाभाग वर आलाच आहे. त्याप्रसंगी 'तू अगोदर प्रतिज्ञा केलीस तीच मूर्खासारखी होती' असे सांगून कृष्णाने ती अर्जुनास मोडणे भाग पाडले. आणि प्रतिज्ञा पाळलीस तर अधर्म होईल असे सांगितले. उलट भीमाने गदायुद्धात दुर्योधनाला बेंबीच्याखाली