पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
२७
 

ससाण्याच्या स्वाधीन करीना. तेव्हा ससाणा म्हणाला, 'याला तू माझ्या स्वाधीन केले नाहीस तर मी भुकेने मरेन, आणि माझी बायकामुले मरतील. त्यांची हत्या तुझ्या माथी येईल व तुला अधर्म घडेल.' हे ऐकून राजालाही प्रश्न पडला. कपोत द्यावा तर शरणागताचे रक्षण करण्याचे ब्रीद नष्ट होऊन अधर्म घडेल. न द्यावा तर अनेक प्राण्यांच्या हत्येची जबाबदारी येऊन त्यामुळे अधर्म घडेल. या वेळी ससाण्याचे रूप धारण करणारा इंद्र त्याला म्हणाला-

गुरुलाघवमादाय धर्माधर्मावीनर्णये
यतो भूयांस्ततो राजन् कुरुष्व धर्मनिश्चयम् ।

-वन. १३१।१३

 राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता याचा निर्णय करिताना तारतम्य पाहून त्यातल्या त्यात जो जास्त महत्त्वाचा वाटेल, (जे कृत्य जास्त फलदायी वाटेल) तो धर्म होय, असे तू ठरव.
 इंद्राने या ठिकाणी श्रुतिवचनांचा हवाला न देता तुझी तारतम्य बुद्धी तू वापर व तू स्वतःच धर्माधर्म ठरव असे राजाला सांगितले. आणि याचे कारणही उघड आहे. असा दर वेळी उद्भवणारा प्रसंग कल्पून त्या त्या वेळी धर्म कोणता व अधर्म कोणता हे सांगून टाकणे श्रुतीलाही शक्य नाही.
 युधिष्ठिराने एके प्रसंगी भीष्मांना प्रश्न केला की, 'मोठमोठे लोक सुद्धा आम्हांला बाह्यतः जे असत्य व निंद्य वाटते असे आचरण करतात; तर हीन असे जे दस्यू त्यांचे आचरण वेगळे कसे दाखविता येईल ? या प्रश्नामुळे मला कर्तव्याची दिशा कळेनाशी झाली आहे. तरी आपण मला मार्ग दाखवा. त्यावर भीष्मांनी उत्तर देताना जे प्रास्ताविक चार शब्द सांगितले आहेत त्यातील मर्म वरीलप्रमाणेच आहे. भीष्म म्हणाले- 'शास्त्रातील तत्त्वे