पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
२९
 

 धर्माधर्म-निर्णयासंबंधी श्रुतिवचने व सत्पुरुषांचे आचरण यांचे महत्त्व कितपत मानता येईल याविषयी युधिष्ठिराने एके ठिकाणी आपले विचार सांगितले आहेत ते मननीय आहेत. तो म्हणतो,
 'धर्माचे स्वरूप निश्चित आहे असे वाटत नाही, कारण जो संपन्न स्थितीत असतो त्याचा धर्म निराळा आणि जो संकटात असतो त्याचा धर्म निराळा असतो. संकटे काही वेदाच्या योगाने जाणणे शक्य नाही. अर्थात त्याचे स्वरूप निश्चित नसल्यामुळे धर्माचेही स्वरूप निश्चित नाही. सत्पुरुषांचा आचार हा धर्माविषयी प्रमाण असेही म्हणता येत नाही. कारण सत्पुरुषांचा आचार हा धर्म असे मानले आहे त्याचप्रमाणे आचारसंपन्न असतात तेच सत्पुरुष असेही मानलेले आहे. अर्थातच सत्पुरुषत्वाचा निर्णायक आचार व आचाराचा निर्णायक सत्पुरुष असा अन्योन्याश्रय होतो. धर्माचे दुसरे प्रमाण म्हणजे वेदवचने हे होय असे शास्त्रनिष्णात लोकांनी सांगितलेले आहे. परंतु प्रत्येक युगात त्या वेदवचनांचा ऱ्हास होत जातो असे आम्ही ऐकलेले आहे. म्हणूनच कृतयुगातील धर्म निराळे, त्रेतायुगातील निराळे, द्वापरयुगातील निराळे व कलियुगातील धर्म निराळे आहेत. हे सर्व युक्तीच्याच अनुरोधाने केले आहेत असे दिसते. वेदवचन तेवढे प्रमाण असे म्हणणे केवळ लोकांच्या समाधानासाठी आहे (आम्नायवचनं सत्यमित्ययं लोकसंग्रहः ॥ शांति. २६६,९) वेदामध्ये प्रमाणभूत व अप्रमाणभूत अशी दोन्ही प्रकारची वचने आहेत. अशा रीतीने परस्परविरुद्ध वचनांनी युक्त असलेल्या ग्रंथाला प्रमाणत्व कोठून येणार ? हा धर्म प्रथम गंधर्वनगराप्रमाणे मोठा अद्भुत असा दिसतो पण विद्वान् लोक याच्यासंबंधी विचार करू लागले म्हणजे त्याचे नावही राहात नाही. शेतात सोडलेले पाण्याचे पाट जसे