पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

क्रमाक्रमाने क्षीण होऊन जातात तसाच शाश्वत म्हणून प्रतिपादिलेला धर्मही क्रमाने क्षीण होत जातो.'
 मागे एकदा त्रेतायुगाच्या शेवटी फार मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी राजर्षी विश्वामित्र यांची अन्नान्नदशा झाली. क्षुधेने व्याकुळ होऊन ते सगळीकडे भटकत असताना एका चांडाळाच्या घरात शिरले व तेथे टांगलेली कुत्र्याची मांडी त्यांनी हरण करून घेतली.'प्रथम प्राण वाचविणे हाच धर्म होय' असे त्याप्रसंगी त्यांनी मत दिले. त्याचे समर्थन करून भीष्म म्हणतात, 'याप्रमाणे संकटात सापडलेल्या जीवितेच्छू व विद्वान मनुष्याने हवे ते उपाय करून आपले प्राण वाचविले पाहिजेत. कारण प्राण वाचले तरच मनुष्य पुण्य संपादन करू शकतो व त्याचे कल्याणही होते.' इतके सांगून या कथेचा निष्कर्ष म्हणून पितामहांनी सांगितला तो असा : 'यास्तव हे कुंतिपुत्रा, बुद्धिचातुर्यसंपन्न अशा विद्वान पुरुषाने धर्म कोणता याचा निर्णय करण्याच्या कामी बुद्धीचे अवलंबन करून या लोकात वागले पाहिजे.'

तस्मात् कौन्तेय विदुषा धर्माधर्मविनिश्चये
बुद्धिमास्थय लोकेस्मिन् वर्तितव्यं कृतात्मना ॥

- शांति. १४१, १०४

 अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णांनी एके समयी आपला हाच अभिप्राय व्यक्त केलेला आहे. श्रुतीत सर्व धर्माचा ऊहापोह केलेला नसल्यामुळे मनुष्याने तर्काच्या साह्याने धर्माधर्म ठरवावा असे ते म्हणतात. कौशिक नावाच्या माणसाने अतिरिक्त सत्यप्रीती धरून काही निष्पाप लोकांच्या वधास अप्रत्यक्ष साह्य केले. त्यासंबंधी बोलताना श्रीकृष्ण म्हणाले, 'अर्जुना, या समयी कौशिकाने जे भाषण केले ते सत्य असले तरी दुरुक्तच होय.