पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
३१
 

या मोठ्या अधर्माचरणामुळे कौशिकाला नरकात पडावे लागले. धर्माचे सूक्ष्म तत्त्व माहीत नसल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली.

ततो ऽ धर्मेण महता वाग्दुरुक्तेन कौशिकः
गतः सुकष्टं निरयं धर्मसूक्ष्मेष्वतत्त्ववित् ॥

- कर्ण. ७२, ५३

 आता धर्माधर्म निर्णयाचे मर्म कोणते ते सांगतो. ऐक. कित्येक प्रसंगी धर्माचे तत्त्व मनात येणे मोठे कठीण पडते. यासाठी त्याचे बरोबर ज्ञान होण्यास तर्काची मदत घ्यावी लागते. पुष्कळ लोक असे म्हणतात की, धर्माचे तत्त्व श्रुतीतच आहे. यावर मी असे म्हणतो की, 'धर्माचे तत्त्व श्रुतीत आहे हे खरे, पण सर्वच गोष्टी श्रुतीत सांगून त्यांचा तेथे ऊहापोह केलेला नाही. प्राण्यांचा उत्कर्ष हेच धर्माचे मूलतत्त्व आहे हे ध्यानात घेऊन तर्काच्या आधाराने धर्माधर्म-निर्णय करावा.'
 महाभारतातील धर्माचे स्वरूप असे अतिशय उज्ज्वल आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी केलेले नियम म्हणजेच धर्म हे भारतीय तत्त्वज्ञान आपण दृष्टिआड केले. धर्माधर्माचा, कार्याकार्याचा निर्णय मनुष्याने तर्काचा व स्वतःच्या बुद्धीचा आश्रय करून केला पाहिजे हे अमृतवचन आपण विसरलो. आणि देशकालपरिस्थितीप्रमाणे धर्माचे रूप पालटावे लागते, म्हणजे समाजधारणेचे नियम बदलावे लागतात ह्या सिद्धांताकडे आपण दुर्लक्ष केले. आणि त्यामुळेच भारतवर्षाला दुर्गती प्राप्त झाली आहे व आजही होत आहे. धर्माधर्मासंबंधीचा हा व्यामोह आपण दूर सारून श्रीकृष्ण, व्यास, भीष्म या भारती पुरुषांनी उपदेशिलेल्या धर्माचे पुनरपि आचरण केले तर त्या काळी ज्या वैभवाच्या परमोच्च बिंदूला हे राष्ट्र गेले होते त्याच बिंदूला ते पुनरपि जाईल अशी आशा करण्यास मुळीच प्रत्यवाय नाही.

● ● ●