पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
३३
 

 महाभारतात समाजरचनाविषयक जे मुख्य तत्त्व आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध चातुर्वर्ण्यांचे तत्त्व होय. ते तत्त्व जसेच्या तसे ग्राह्य व अनुकरणीय आहे असा आग्रह धरणे युक्त नाही. पण खरे म्हटले तर आज जी जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याची कल्पना प्रचलित आहे ती महाभारतात इतक्या तीव्रतेने प्रतिपादिलेली नाही. वर्ण हा जन्मसिद्ध आहे असा एक अतिशय आग्रही व प्रभावी विचार महाभारतात आढळतो हे खरे आहे. तो गृहीत धरूनच भारतात वर्णधर्म बहुतेक ठिकाणी सांगितलेले आहेत हेही खरे आहे. पण एकतर वर्ण हा जन्मसिद्ध नसून गुणकर्मसिद्ध आहे असा दुसराही एक विचार महाभारतात पाचसात ठिकाणी प्रतिपादिलेला आढळतो; आणि दुसरी व विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की समाजव्यवस्था करताना जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य जरी महाभारतात आग्रहाने सांगितलेले असले तरी ती व्यवस्था जितकी निर्विष करता येईल तितकी करण्याचा त्यात प्रयत्न केलेला आढळून येतो. आणि आनुवंशिक गुणांवर पूर्ण श्रद्धा ज्या काळात होती त्या काळी हे विष इतके नष्ट करून समाज समतेच्या तत्त्वावर शक्य तितका सुप्रतिष्ठित करण्याचे धोरण त्या तत्त्ववेत्त्यांनी अंगीकारले यांतच त्यांच्या विचारांची थोरवी व समाजहिताविषयीची दक्षता दिसून येते.
 प्रथमतः चातुर्वर्ण्यव्यवस्था काय होती ती थोडक्यात सांगतो आणि नंतर तशा स्थितीतही उच्चनीचतेचे विष तिच्यातून काढून टाकून ती व्यवस्था समाजाच्या उत्कर्षाला शक्य तितकी जास्त पोषक करण्याचा किती प्रयत्न केला होता त्याचे निरूपण करतो.
 महाभारतात वर सांगितल्याप्रमाणे गुणकर्मसिद्ध चातुर्वर्ण्याचा विचार जरी काही ठिकाणी सापडत असला तरी समाजव्यवस्था
 ३...