पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

दान, अध्ययन, यज्ञ व प्रजांचे पालन ही धर्म्य असोत वा अधर्म्य असोत; ही कामे जन्मतःच तुझ्यामागे लागलेली आहेत.
 पण जन्मावरच वर्ण अवलंबून आहे, या मताला यापेक्षाही बलवत्तर पुरावा भारतीयांनी सांगितलेल्या वर्णकर्म व्यवस्थेच्या विवेचनात सापडतो. वर्ण जन्मावरून ठरवावा या विचाराला विरोधी वचने काही ठिकाणी महाभारतात सापडतात हे खरे, पण प्रत्यक्ष समाजव्यवस्था करताना मात्र ती विरोधी वचने कोठेही लक्षात घेतलेली नाहीत असे स्पष्ट दिसून येते. त्या वेळी 'वर्ण हा जन्मावरचा ठरतो,' हा सिद्धांत गृहीत धरूनच सर्व नियम सांगितलेले आहेत. चार वर्णांची कर्मे कोणती, त्यांनी कोणते व्यवसाय करावे हे सांगताना ब्राह्मणाने अमके कर्म करावे, क्षत्रियाने अमके करावे असे सांगितलेले असते. अमके करील तो ब्राह्मण असे मत जरी कोठे सांगितलेले असले तरी समाजव्यवस्थेत त्या मताला स्थान नाही. जो सत्य अहिंसा या धर्माचे आचरण करील तो माणूस शूद्र असला तरी ब्राह्मण होय असे मत सांगितलेले आहे. पण त्यामुळे शूद्राने अध्यापन करावे, याजन करावे असे मात्र कोठेही सांगितलेले नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्ण जन्मसिद्ध धरूनच कर्मव्यवस्था सांगितलेली आहे.
 युद्धापूर्वी संजय पांडवांना 'तुम्ही युद्ध करू नका' असा उपदेश करू लागला. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'चारही वर्णांचे विहित व्यवसाय काय आहेत ते लक्षात घेऊन मग तू उपदेश कर. चतुर्वर्णाचे विहितधर्म असे आहेत. ब्राह्मणाने .वेदाध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही कर्मे करावी. क्षत्रियाने प्रजापालन करावे. यज्ञयाग, वेदाध्ययन ही कर्मे करावी. त्याने यज्ञ चालवू नयेत व अध्यापन करू नये. संसार