पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
३७
 

करून गृहस्थाश्रमातच असावे. वैश्याने वेदाध्ययन करून शेतकी, गोरक्षण, व्यापार ही कर्मे करावी. शूद्राने ब्राह्मणांची सेवा करावी. वेद पढू नयेत. यज्ञाचीही त्याला मोकळीक नाही.'
 श्रीकृष्णांनी येथे वर्णधर्म सांगितले आहेत. त्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, हे वर्ण जन्मसिद्ध धरूनच त्यांची कर्मे सांगितली आहेत. अध्ययन, अध्यापन करील तो ब्राह्मण, क्षात्रतेज दाखवील तो क्षत्रिय असे तर सांगितलेले नाहीच पण उलट क्षत्रियाने अध्यापन करू नये. शूद्राने वेदाध्ययन करू नये असे सांगितलेले आहे.

न याजयेत् न तु चाध्यापयीत । एवं स्मृतः क्षात्रधर्मः पुराणः ॥
नाधीयीत प्रतिषिद्धोऽस्य यज्ञः । एवं स्मृतः शूद्रधर्मः पुराणः ॥

- उद्योग. अ. २९, २४-२७

 गुणकर्मावरून जर ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व ठरावयाचे असते तर क्षत्रियाने अध्यापन करू नये, याजन करू नये असे सांगण्याचे कारण नव्हते. किंवा शूद्राने वेदाध्ययन किंवा यज्ञ करू नये, असेंही सांगण्याचे कारण नव्हते. गुणकर्मावर जेथे वर्ण ठरावयाचा तेथे कोणाही व्यक्तीला कोणताही व्यवसाय, कोणतेही कर्म करण्यास मोकळीक असली पाहिजे. आणि ज्या क्षेत्रात मनुष्य तेज दाखवील त्या वर्णाचा त्याला म्हणावे असा दण्डक असला पाहिजे. पण महाभारतात तसे सांगितलेले नाही हे श्रीकृष्णाच्या वरील उद्गारांवरून दिसून येते. असे विधिनिषेध महाभारतात अनेक ठिकाणी सांगितले आहेत. वर्णाश्रमवर्माचे विवेचन करताना पितामह भीष्मांनीही हेच सांगितले आहे. 'क्षत्रियाने यज्ञ करावा पण यज्ञाचे प्रयोग चालवूं नयेत, स्वतः अध्ययन करावे पण अध्यापन करू नये. संग्राम हाच क्षत्रियाचा मुख्य धर्म होय.' -(शांति अ. ६०)
 एके ठिकाणी शास्त्राविरुद्ध कर्मे करणाऱ्या लोकांची राजाने