पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

कधीही उपेक्षा करू नये असे सांगून पितामह भीष्मांनी शास्त्रयुक्त कर्मे कोणती व विरुद्ध कोणती हे सांगण्यासाठी केकय देशाच्या राजाची गोष्ट सांगितली आहे. त्या राजाला एकदा अरण्यात एका राक्षसाने धरिले. त्या वेळी, 'तुला मला धरण्याचा अधिकार नाही, कारण माझ्या राज्यात प्रजा स्वकर्मनिष्ठ आहे,' असे राजाने सांगितले. तो म्हणाला, 'अध्ययनशून्य, व्रतशून्य ब्राह्मण नाहीत. म्हणजे ते स्वकर्मनिष्ठ आहेत. त्याचप्रमाणे क्षत्रिय हे अध्ययन करितात पण अध्यापन करीत नाहीत. यज्ञ करितात पण दुसऱ्याचे यज्ञ चालवीत नाहीत. सारांश, माझ्या राष्ट्रामध्ये क्षत्रिय हे स्वकर्मनिष्ठ आहेत.' -(शां. ७७)
 या सर्व वचनांवरून महाभारतकारांनी चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध धरूनच समाजव्यवस्था सांगितली आहे हे स्पष्ट होते. पण या मताच्या विरुद्ध असेही जिवंत विचारप्रवाह भारतात दिसून येतात म्हणून वर सांगितले आहे, त्याचे आता दिग्दर्शन करतो.
 व्यक्तीचे गुण हे रक्तावर, आनुवंशावर, आईबापांच्या गुणांवर अवलंबून असतात या म्हणण्यात फारसा अर्थ नाही हे भारतकाळच्या विचारी पुरुषांच्या पुन्हा पुन्हा ध्यानी येत होते असे त्यांच्या उद्गारांवरून दिसून येते. पांडवांचा अज्ञातवास संपला. नंतर राज्य परत मिळविण्यासाठी काय उद्योग करावा याविषयी तत्पक्षीयांची सभा भरून विचारविनिमय सुरू झाला. त्या वेळी दुर्योधनापुढे पांडवांनी नमून बोलले पाहिजे असे बलराम सांगू लागले. ते सात्यकीला सहन न होऊन तो म्हणाला,

एकस्मिन्नेव जायेते कुले क्लीबमहाबलौ
फलाफलवती शाखे यथैकस्मिन्, वनस्पतौ ।

-उद्योग. ३.३