पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
३९
 

 एकाच वृक्षावर ज्याप्रमाणें फळांनी भरलेली व फलरहित अशा दोनहि प्रकारच्या शाखा असतात त्याचप्रमाणे एकाच कुळात अतिबलाढ्य व अत्यंत दुबळे असे पुरुष जन्मास येतात. श्रीकृष्ण अत्यंत बलाढ्य व बलराम दुबळे असा सात्यकीचा अभिप्राय आहे.
 एकाच आईबापांच्या पोटी असे अगदी दोन टोकाचे पुत्र होऊ लागले तर माणसाचे गुण जन्मतः ठरलेले आहेत व त्यावरच त्याचे कर्म ठरून जावे, आणि क्षत्रियाने अध्यापन करू नये व शूद्राने वेदाध्ययन करू नये या म्हणण्यातला जीव निघून जातो. आणि हे ध्यानात घेऊनच भारतातील अनेक पुरुषांनी गुणांवर ब्राह्मण्य, क्षत्रियत्व अवलंबून असते असा विचार मांडलेला आहे. तो प्रभावी होऊन त्याप्रमाणे समाजव्यवस्थेत बदल झाला नाही हा भाग निराळा. पण अनुभव जमेस धरून त्याप्रमाणे विचार करणारी माणसे तेव्हा होती हे यावरून स्पष्ट दिसते.
 नहुष व धर्मराज यांच्या संवादात हा विचार अगदी निश्चित शब्दांत आढळतो. 'ब्राह्मण कोणास म्हणावे?' असे नहुषाने विचारले तेव्हा धर्मराज म्हणाला की, 'ज्याच्या अंगी सत्य, दान, दया, अहिंसा हे गुण दिसून येतात त्यास ब्राह्मण म्हणावे.' त्यावर नहुष म्हणाला, 'तुझे म्हणणे युक्त नाही. कारण सत्य, दान, क्षमा, दया, अहिंसा हे गुण शूद्राच्याहि अंगी असतात.' त्यावर युधिष्ठिर म्हणाला,

शूद्रे तु यद् भवेत लक्ष्म द्विजे तच्च न विद्यते ।
न वै शूद्रो भवेत् शूद्रो ब्राह्मणो नच ब्राह्मणः ॥

- वन. १८०.२५