पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
४१
 

(ब्राह्मण) मानतात. मी मात्र त्याला जगताचे प्रधानकारण जो विष्णू त्याच्याशी (क्षत्रिय) सजातीय मानतो. (शांति. २९६)
 धर्मराजाला संन्यासनिवृत्तीचा उपदेश करताना अर्जुन म्हणाला, 'राजा इन्द्र हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून तो आपल्या कर्माने क्षत्रिय झाला आहे.' (शां. २२)
 भृगु- भारद्वाज संवादात, भिन्नभिन्न वर्ण कर्मामुळे झाले असे भृगूने आपले मत दिले आहे. भृगू म्हणतो, 'जग ब्रह्मदेवाने निर्माण केले असल्यामुळे प्रथम वर्णभेद नव्हता. प्रथम सर्व ब्राह्मणच होते व मग कर्मामुळे त्यांचे भिन्नवर्ण झाले. यांपैकी जे रजोगुणी, कोपिष्ट, साहसी होते व ज्यांनी ब्राह्मणधर्म टाकिला ते क्षत्रिय झाले. ज्यांच्यात रज व तम या गुणांचे मिश्रण होते व ज्यांनी ब्राह्मणधर्म टाकून पशुपालन व कृषी हे व्यवसाय पत्करिले, ते वैश्य झाले. जे तमोगुणी असून हिंसा व असत्य यांवर आसक्त झाले आणि हव्या त्या कर्मावर उपजीविका करू लागले ते शूद्र झाले. सारांश, इत्येतैः कर्मभिर्व्यस्ता द्विजा वर्णान्तरं गताः । (शांति. १८८. १४.) 'आपापल्या भिन्न कर्मांमुळे मूळच्या ब्राह्मणांपासून भिन्न भिन्न वर्ण निर्माण झाले.' याच संवादात पुढे भारद्वाजाने, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा भेद कशाच्या योगाने होतो ते मला सांगा' असे विनविल्यावरून भृगू म्हणाला, 'जो पुरुष जातकर्मादी संस्कारांनी शुचिर्भूत होऊन वेदाचे अध्ययन- अध्यापन करतो, जो सदाचारसंपन्न व सत्यनिष्ठ आहे तो ब्राह्मण होय. जो हिंसाजनक कृत्ये करतो, वेदाध्ययन करतो, प्रजापालन करतो तो क्षत्रिय होय. जो व्यापार, पशुपालन, करतो व जो वेदाध्ययनसंपन्न आहे तो वैश्य होय व ज्याने वेदाचा त्याग केला आहे व अनाचार पतकरिला आहे, जो अशुद्ध व अमंगळ आहे