पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

तो शूद्र होय. शूद्राच्या ठायी वरील सत्य अहिंसादी गुण दिसतील तर तो शूद्र नव्हे व ब्राह्मणाच्या ठायी ते दिसणार नाहीत तर तो ब्राह्मण नव्हे.' -(शांति १८९)
 पराशर- जनकसंवादात पराशराने जनकास असेच मत सांगितले आहे. जनकाने विचारले, 'हे महामुने, मला एक संशय उत्पन्न झाला आहे, तो आपण उलगडून सांगा. संशय असा की, मनुष्याला जो हा वर्णात कमीपणा येतो तो त्याच्या कर्माच्या हीनत्वामुळे की जातीमुळे?'
 यावर पराशर म्हणतो- 'हे महाराजा, या कामी कर्म आणि जाती ही उभय हीनत्वास कारण होतात. मात्र त्यात थोडा फरक आहे. तो असा की, हीन जाती व हीन कर्म ही दोन्ही एकाचे वाट्यास आली असली तरी त्याने जातीची पर्वा न करता हीन कर्माचा त्याग करावा म्हणजे झाले. कारण, जातीने हीन असूनही जर तो दुष्ट कर्म न करील तर त्यास उत्तम पुरुषांत गणण्यास काहीच हरकत नाही. बरे, याचे उलट जातीने उत्तम असूनही पुरुष जर निंद्य कर्म करील तर ते कर्म त्याला हीनत्व आणील. यावरून पाहता जातीपेक्षा कर्माचे हीनत्व अधिक बाधक होते.' -(शांति. २९६)
 याप्रमाणे वर्ण हे जन्मसिद्ध की कर्मसिद्ध यासंबंधी महाभारतकारांचे विचार काय आहेत ते आपण पाहिले. यात असे दिसले की, भारतीय तत्त्ववेत्त्यांच्या मते प्रधानतः वर्ण हे जन्मसिद्ध आहेत आणि ते तसे गृहीत धरूनच त्यांनी समाजव्यवस्था सांगितली आहे. आता वर्ण हे कर्मसिद्ध आहेत हा विचारही मधून मधून अनेकांनी व्यक्त केला आहे आणि काही मोठ्या तत्त्ववेत्त्यांनी तो मान्यही केला आहे. पण ते एक मत म्हणून त्यांनी फक्त मान्य