पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
४३
 

केलेले आहे. समाजव्यवस्था करताना हे मत त्यांनी विचारात घेतलेले नाही. शूद्र हा सत्य, अहिंसा इत्यादी गुणांनी युक्त असे आचरण करील तर तो ब्राह्मण होय, असे म्हटले आहे. पण त्याने याजन करावे किंवा अध्यापन करावे असे मात्र कोठेही सांगितलेले नाही. त्यांचप्रमाणे कर्माने तो क्षत्रिय झाल्यास क्षत्रिय स्त्री विवाह करण्यास त्याला हरकत नाही असेही कोठे सांगितलेले नाही. उलट याचा तीव्र निषेधच केलेला आहे.
 आनुवंशावरील दृढ विश्वास हे या व्यवस्थेचे मुख्य कारण आहे असे दिसते. मातापित्यांचे गुण वंशपरंपरेने अपत्यांत संक्रान्त होतात असे त्यांना वाटत होते. माणसाचे गुण रक्तावर अवलंबून आहेत आणि रक्तात भेसळ झाली तर ते गुण नष्ट होतील असे त्यांचे मत होते. लोभी पुरुषाचा पुत्र लोभी होतो व रागद्वेषहीन पुरुषाचा पुत्र रागद्वेषहीन होतो, (शां. २६३. ९) असे मानण्यापर्यंत कोठे कोठे हा आनुवंशावरील विश्वास गेलेला आहे आणि विशिष्ट जातीतच विशिष्ट गुण असतात हा सिद्धांत धरून व्यवस्था केलेली आहे. वर्णसंकर झाल्यास हे गुण नष्ट होतील अशी भीती या तत्त्ववेत्त्यांच्या मनांत असल्यामुळे त्यांनी वर्णसंकराचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केला आहे. वर्णसंकराची भीती महाभारतकारांना काही कल्पनातीत वाटत होती असे दिसते. कारण सर्व जगात वर्णसंकर हे एकच महत संकट आहे असे मानूनचं काही ठिकाणी त्यांनी विवेचन केले आहे. युद्धामुळे होणारा मोठा अनर्थ म्हणजे वर्णसंकर होय; वर्णसंकर होऊ न देणारा राजा तो उत्तम राजा; अव्यवस्था होऊन वर्णसंकर होऊ लागल्यास वाटेल त्याने हातात शस्त्र घ्यावे व हे भयंकर अरिष्ट टाळावे. इत्यादी उद्गारांवरून वर्णसंकराचे भय त्यांना किंती वाटे ते दिसून येते.