पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
४५
 

मान द्यावा असे भारतीयांनी कधीही सांगितले नाही. तेच ब्राह्मणा- संबंधी आहे. ब्राह्मणवर्ण हा जन्मावरून गृहीत धरून ब्राह्मणाने यजन याजन इ. कार्ये करावी असा दंडक घातलेला आहे. पण ब्राह्मणाने आपली कार्ये केली नाहीत तरी केवळ जन्मामुळेच त्याला श्रेष्ठ मानावे ही मनुस्मृतीतली समाजहिताला अत्यंत घातक अशी कल्पना त्यांना स्वप्नातसुद्धा शिवलेली दिसत नाही.
 गुण हे जन्मसिद्ध धरून त्या अन्वये कार्ये ठरवून देणे हे तत्त्व समाजाला बाधक आहेच, पण त्यापेक्षाही केवळ जन्मामुळे, गुण प्रकट झाले नसताही, उच्चनीचताही ठरविली तर ते धोरण मात्र समाजाचा घात केल्यावाचून राहात नाही आणि भारतीय तत्त्ववेत्त्यांनी या घातक धोरणाचा कधीही पुरस्कार केलेला नाही. जन्मावर वर्ण ठरवून त्या अन्वये पदाधिकार ठरविले तर दोन प्रकारचे दोष निर्माण होतात. एक म्हणजे ज्यांच्या अंगी गुण नाहीत ते पदाधिकारी होऊन बसतात व त्यामुळे घात होतो व दुसरा म्हणजे ज्यांच्या अंगी गुण आहेत त्यांना पदाधिकार मिळत नाही व त्यांच्या गुणांचा विकास होत नाही. क्षत्रिय कुळात जन्मलेले सर्वच पुरुष धैर्य-शौर्य गुणांनी युक्त असतात, ज्ञानाची लालसा, धनार्जनाची बुद्धी हे गुण त्यांच्या ठायी नसतातच असे नाही. आणि वैश्य कुळात जन्मलेल्या पुरुषांच्या अंगी धनोत्पादनाचे सर्व गुण असतात आणि क्षत्रियाचे किंवा ब्राह्मणाचे गुण नसतात असेही नाही. त्यामुळे शौर्य धैर्य नसलेल्या क्षत्रियाला राजपद किंवा सेनाध्यक्षाचे पद देणे म्हणजे नालायक माणसाला पदाधिकार देणे होय व ते गुण अंगी असणाऱ्या वैश्याला तो न देणे म्हणजे त्याच्या गुणविकासाला संधी न देणे होय. या दोन्ही गोष्टी समाजाला घातक आहेत. यांपैकी नालायक माणसाला पदाधिकार