पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

देणे हा जो दोष तो भारतीय तत्त्ववेत्त्यांनी समूळ नष्ट केला आहे आणि गुणी माणसाच्या गुणविकासाला संधी न मिळणे हा दोष शक्य तितका नष्ट व्हावा अशी योजना केली आहे. हे त्यांनी कसे घडविले ते आता पाहावयाचे आहे.
 भीष्म सांगतात, 'हे राजा, ब्राह्मणांना इन्द्रियदमन, शुचिर्भूतपणा व सरलत्व हे धर्मविहित आहेत. जो ब्राह्मण इंद्रियदमन करतो, जो सदाचारसंपन्न, दयाशील, सहिष्णू, निरिच्छ, असा असतो, तोच खरा ब्राह्मण होय. हे गुण नसलेला ब्राह्मण ब्राह्मण नव्हेच. दुराचारी, शास्त्राविरुद्ध कर्मे करणारा, दुष्ट असा ब्राह्मण शूद्र होतो. राजा त्याने वेदजप केला असला किंवा नसला तरी तो शूद्रतुल्य असल्यामुळे त्याला दासाच्या योग्यतेचे भोजन द्यावे व त्याला देवकृत्यात वर्ज्य मानावे (जपन् वेदानजपंश्चापि राजन् । समः शूद्रैर्दासवच्चापिभोज्यः । एते सर्वे शूद्रसमा भवन्ति । राजन्नेतान्वर्जयेत् देवकृत्ये ॥ शां. ६२, ५)' पितामह भीष्मांनीच ब्राह्मणभेदकथन करताना असे सांगितले आहे की,

जन्मकर्मविहीना ये कदर्या ब्रह्मबन्धवः ।
एते शूद्रसमा राजन् ब्राह्मणानां भवन्त्युत ॥
अश्रोत्रियाः सर्व एते सर्वे चानाहिताग्नयः ।
तान् सर्वान् धार्मिको राजा बलिं विष्टिंच कारयेत् ॥

- शां. ७६, ७ व ८

 ब्राह्मणजन्मास योग्य अशा कर्माचा त्याग करणारे जे कृपण ब्राह्मण ते शूद्रसम होत, तसेच वेदाध्ययन न करणारे व अग्न्याधान न करणारे जे ब्राह्मण तेही सर्व शूद्रतुल्यच असल्यामुळे धर्मनिष्ठ राजाने त्यांच्याकडून कर घ्यावा व त्यांना वेठीच्या कामालाही लावावे.