पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
४७
 

 व्यासांनीही ब्राह्मणजन्माच्या सार्थकाविषयी बोलताना हाच अभिप्राय व्यक्त केला आहे.

ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते
इह क्लेशाय तपसे, प्रेत्य त्वनुपमं सुखम् ।

-(शां. ३२१, २३)

 ब्राह्मणाचा देह सुखोपभोगासाठी निर्माण झालेला नाही. इहलोकी क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठी ब्राह्मण जन्मला आहे. असे केल्यानेच त्यास परलोकी निरुपम सुख मिळेल.
 ब्राह्मणाला शिक्षा करण्यासंबंधी व त्याच्या वध्यत्वासंबंधीही महाभारतकारांनी असाच अगदी निःपक्षपाताने निर्णय दिला आहे.
 एके ठिकाणी ब्राह्मणाने मोठा अपराध केला असला तरी त्याला शरीरदंड करू नये, त्याला फक्त हृद्दपार करावा असे भीष्मांनी सांगितले आहे. (शां. ५६) पण व्यासांनी याहीपुढे जाऊन अशा ब्राह्मणाचा वध करावा असे सांगितले आहे. व्यास म्हणतात 'युधिष्ठिरा, वेदपारंगत असणारा ब्राह्मणही शस्त्र घेऊन वध करण्याच्या इच्छेने आला तर त्याचा युद्धामध्ये वध करावा. त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. हे कुंतीपुत्रा, अशा प्रकारचा मंत्रच वेदामध्ये आहे. वेदप्रमाणमूलकच धर्म मी तुला सांगत आहे.' (शां. ३४) अश्वमेध करण्याचा उपदेश युधिष्ठिराला करीत असताना व्यासांनी ब्राह्मणाच्या वध्यत्वासंबंधी सोदाहरण विवेचन केले आहे. ते म्हणाले, 'पूर्वी देव-दैत्यांचे युद्ध चालू असता देवांनी दैत्यांना ठार करून स्वर्ग मिळविला आणि त्याच वेळी दर्पामुळे विचारशून्य झालेले, शालावृक नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध असलेले वेदपारंगत असे ब्राह्मण दानवांना साह्य करण्यासाठी त्यांच्या आश्रयाला जाऊन राहिले होते. तेव्हा हे भरतकुलोत्पन्ना, देवांनी