पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

त्या अठ्ठ्याऐशी हजार ब्राह्मणांचाही वध केला. त्याप्रमाणे धर्माचा उच्छेद व्हावा अशी इच्छा करणारे, अधर्मप्रवर्तक लोक असतील तर त्या दुरात्म्यांचाही वध केला पाहिजे.' -(शां. ३३)
 ब्राह्मणाविषयी हे जे धोरण सांगितले आहे त्यावरून उच्चनीचता ही जन्मावर ठेवावयाची नाही फक्त गुणांवर ठेवावयाची हे भारतीयांचे धोरण अगदी स्पष्टपणे दिसून येते.
 ब्राह्मणाप्रमाणेच क्षत्रियांसंबंधीही धोरण आहे. प्रजेचे पालन करणे, शत्रूपासून तिचे रक्षण करणे, व उत्कृष्ट दंडनीती प्रस्थापून धर्माचा उत्कर्ष करणे हे राजाचे व क्षत्रियांचे कर्तव्य होय. हे कर्तव्य जे बजावणार नाहीत ते क्षत्रियच नव्हेत असे महाभारतात अनेक ठिकाणी सांगितले आहे.

यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात्
क्षत्रियों जीविताकांक्षी स्तेन इत्येव तं विदुः ॥

- उद्योग. १३४.२

 जीवाच्या आशेने जो क्षत्रिय पराक्रम करण्याचे टाळतो, व यथाशक्ती आपले तेज प्रगट करीत नाही, तो क्षत्रिय नसून चोर आहे असे म्हटले पाहिजे, असे विदुलाराणीने आपल्या पुत्रास सांगितले आहे. त्याचप्रमाणे-

रक्षणं सर्व भूतानामिति क्षात्रं परं मतम् ।

- शां. १२०.३

 सर्व प्राण्यांचे संरक्षण करणे हा क्षत्रियाचा मुख्य धर्म होय, असे शास्त्रांचे मत आहे. असे पितामह भीष्मांनी सांगितले आहे. क्षत्रियाच्या धर्मासंबंधी महाभारतात अशी शेकडो वचने आहेत. आणि शांतिपर्वातील राजधर्मपर्व हे तर त्यासाठीच आहे. प्रवृत्तीधर्माच्या विवेचनात त्याचे साकल्याने विवेचन येणार असल्यामुळे येथे विस्तार