पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

क्षत्रिय या उभयतांनी प्रजेचे पालन केले पाहिजे." हे मुचकुंदाचे उद्गार युधिष्ठिराला सांगून भीष्म म्हणतात, 'ब्राह्मणांच्या हाती सदैव सुखदुःख देण्यास समर्थ असे उदक असते व क्षत्रियांच्या हाती शस्त्र असते. जगतामध्ये जे काही आहे ते सर्व या उभयतांच्या म्हणजे ब्राह्मणांच्या व क्षत्रियांच्या अधीन आहे.- (शांति अ. ७४)
 ऐलकश्यप संवादात कश्यपमुनी ऐलाला म्हणाले-

एतौ हि नित्यं संयुक्तौ इतरेतरधारणे ।
क्षत्रं वै ब्रह्मणो योनिर्योनिःक्षत्रस्य वै द्विजाः ॥

- शा. ७३.४९.

 ब्राह्मण व क्षत्रिय हे परस्परांशी मिळून असले म्हणजे त्यांचे पोषण होते. क्षत्रिय हे ब्राह्मणांचे उत्पत्तिस्थान असून ब्राह्मण हे क्षत्रियांचे उत्पत्तिस्थान आहे.
 पितामह भीष्मांचेही असेच मत आहे. ते म्हणतात, 'युधिष्ठिरा, ईश्वराने ब्राह्मण व क्षत्रिय हे उभयता समान अंतःकरण असलेले परस्परांचे मित्र म्हणून निर्माण केले आहेत. ब्राह्मण व क्षत्रिय या उभयतांचा सन्मान केल्यास प्रजेला सुखप्राप्ति होते व त्या उभयतांचा अपमान केल्यास प्रजेचा निःसंशय नाश होतो. ब्राह्मण व क्षत्रिय हेच सर्व प्रजेला मूलभूत आहेत. (ब्रह्मक्षत्रं हि सर्वासां प्रजानां मूलमुच्यते. -शां. ७३. ४३)
 जुन्या ग्रंथांत ब्राह्मणाला देव पदवी दिलेली आढळते. पण त्याचप्रमाणे क्षत्रियालाहि दिलेली आढळते हे विसरून चालणार नाही. मांधात्याला उपदेश करताना इंद्र म्हणाला, "सर्व लोकांचा गुरूच अशा राजाचा जो अपमान करतो त्याने दिलेले दान व त्याने केलेले यज्ञ व श्राद्ध यांचे फल मिळत नाही. मनुष्यांचा अधिपति,