पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
५१
 

इतकेच नव्हे तर मूर्तिमंत आणि सनातन देवच असा जो धर्माभिलाषी राजा त्याचा अपमान देव देखील करीत नाहीत. भगवान ब्रह्मदेवाने सर्व जग निर्माण केले, तथापि त्याची सत्कर्माकडे प्रवृत्ती व दुष्कर्मापासून निवृत्ती झाली पाहिजे, एतदर्थ त्याला क्षत्रियांची अपेक्षा वाटली. धर्माची प्रवृत्ती झाली म्हणजे त्याचे फल काय मिळते, याचे ज्याच्या बुद्धीला ज्ञान असते तोच राजा मान्य व पूज्य होय, आणि तोच क्षत्रिय धर्माचा खरा आधार होय. (शांति, अ. ६५)
 युधिष्ठिराने एकदा पितामह भीष्मांना विनविले की, हे भरत कुलश्रेष्ठा, मनुष्यांचा अधिपति जो राजा त्याला ब्राह्मण लोक देवता का मानतात, ते मला सांगा. तेव्हां भीष्मांनी त्याला बृहस्पतीने वसुमना राजास सांगितलेले विचार सांगितले.
 बृहस्पती म्हणाला, 'हे नरश्रेष्ठा, राजा हाच लोकांच्या धर्माचे मूळ आहे असे दिसून येते. राजाने पालन केले नाही तर वेदत्रयांचे अस्तित्व नष्ट होईल. ब्राह्मण वेदाध्ययन करणार नाहीत, लोक अनीतीने वागू लागतील, सर्वत्र वर्णसंकर होईल व राष्ट्रात दुर्भिक्ष येईल. म्हणून हा एक मनुष्यच आहे असे समजून राजाचा केव्हाही अवमान करू नये. कारण ती एक मनुष्याचे रूप धारण करणारी देवता आहे. जो मनुष्य राजाचे वाईट व्हावे अशी इच्छा करीत तो इहलोकात क्लेश पावून मरणोत्तर नरकास जाईल.' -(शां. ६८)
 क्षत्रिय व ब्राह्मण हे अशा रीतीने सर्व राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. ते एक असतील तर शत्रूचा निःपात करतील व त्यांच्यात जर फूट झाली तर राष्ट्राचा नाश होईल, असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत आहे.