पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

ब्रह्म क्षत्रेण सहितं क्षत्रं च ब्रह्मणा सह
संयुक्तौ दहतः शत्रून् बनानीवाग्निमारुतौ ।

-वन. १८५, २५

 ब्राह्मणास क्षत्रियाचे व क्षत्रियास ब्राह्मणाचे साहाय्य असले म्हणजे ते उभयता मिळून, ज्याप्रमाणे अग्नी आणि वायू हे परस्परांचे साह्य करून वन जाळून टाकतात, त्याप्रमाणे शत्रूंचा नाश करतात.
 महाभारतातील महान धर्मवेत्ता सनत्कुमार याचे हे उद्गार आहेत. क्षत्रिय व ब्राह्मण हे दोन्ही वर्ण असे सम असले आणि ब्राह्मणधर्म व क्षात्रधर्म या दोहींची राष्ट्राला सारखी गरज असली तरी राष्ट्राचे रक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे भारती तत्त्ववेत्त्यांना क्षात्रधर्माची महती जास्त वाटते हे निःसंदिग्ध शब्दात त्यांनी सांगितले आहे.
 भीष्म म्हणतात, 'हे पांडुपुत्रा, लोक व वेद या दोहोंमध्ये ज्यांना श्रेष्ठ मानले आहे असे चारही आश्रमांचे धर्म व यतिधर्म या सर्वांना क्षत्रिय धर्म हाच आधार आहे. हे भरतकुलश्रेष्ठा, ही सर्व कर्मे क्षत्रिय धर्मावरच अवलंबून आहेत. क्षत्रियधर्म सुव्यवस्थितपणे चालत असेल तर मनुष्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात. या एका क्षात्रधर्मामध्ये सर्व धर्म प्रविष्ट झालेले आहेत म्हणून हाच धर्म श्रेष्ठ होय.'
 राजा मांधाता यास उपदेश करताना सुरेश्वर इंद्राने पुढील विवेचन केले आहे.
 पूर्वी श्रीविष्णूने क्षात्रधर्माचेच अवलंबन करून शत्रूंचा निःपात करून, बलसंपन्न अशा देवांचे व ऋषींचे रक्षण केले.