पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना

साध्यसाधनांतील तारतम्यहीनता, नकली दारिद्यप्रेम या घातक दोषांचा प्रादुर्भाव झाला आणि आजही त्यांचा जोर फारसा कमी झालेला नाही. अशा वेळी महाभारतातील राष्ट्रधर्माच्या सिद्धांतांचा आपण अभ्यास केला व निष्ठेने त्यांचे पालन केले तर वास्तव, व्यवहारी दृष्टी. आपल्याला पुन्हा लाभण्याचा संभव आहे.
 धर्म हे साध्य नसून समाजाच्या उत्कर्षाचे साधन आहे, मनुष्याची योग्यता जन्मावरून ठरविण्यापेक्षा त्याच्या गुणांवरून ठरवावी, कृतयुग वा कलियुग हे राजसत्ताधाऱ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते आणि मोक्ष हे अंतिम साध्य असले तरी ऐहिक राष्ट्रीय प्रपंचाच्या वैभवाकडे कदापि दुर्लक्ष होता कामा नये, हे ते सिद्धांत आहेत. वेदव्यासांच्या आशीर्वादाने आपल्या समाजाला त्यांचा अभ्यास व प्रतिपालन करण्याची बुद्धी होवो अशी शुभेच्छा प्रगट करून ही प्रस्तावना संपवितो.
 हा प्रबंध लेखमालेच्या रूपाने प्रथम मार्च, एप्रिल, मे व जुलै १९६१ या महिन्यांच्या 'वसंत'च्या अंकात प्रसिद्ध झाला. तो आता पुस्तक-रूपाने प्रसिद्ध होत आहे. भाषांतररूपाने तो हिंदीत प्रसिद्ध व्हावा. असे बरेच दिवस मनात होते. पण इतके दिवस जमत नव्हते. आता सुदैवाने ते साधले आहे. 'राष्ट्रधर्म'- लखनौ- संपादक- राम शंकर अग्निहोत्री, या मासिकात व 'रविवासरीय युगधर्म'- नागपूर, जबलपूर, रायपूर,- संपादक- सत्यपाल पटाइत- या साप्ताहिकात हा प्रबंध क्रमशः प्रसिद्ध होत आहे.
 माझे मित्र श्री. अनंतराव कुलकर्णी यांनी या प्रबंधाच्या प्रकाशनाची जोखीम हौसेने अंगावर घेतली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

पु. ग. सहस्रबुद्धे