पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 सत्य नसेल, कपट असेल तर तो धर्मच नव्हे, असे एकदा सांगितले आहे, पण अन्यत्र कपटाचरणाचा, असत्याचा जाणून-बुजून उपदेश केला आहे.
 ही परस्परविरुद्ध, अत्यंत विसंगत अशी वचने पाहिली म्हणजे महाभारतात कशाचा नेमका उपदेश करावयाचा आहे हे ध्यानात येणे कठीण होऊन बसते. अशी वचने एक दोन ठिकाणी असती तर ती उपेक्षणीय म्हणून सोडून देता आली असती. पण तसे नाही. अशी विरोधी वचने महाभारतात शेकड्यांनी सापडतील. बरे ही वचने काही सामान्य माणसांच्या तोंडीच आहेत असे नाही. तर श्रीकृष्ण, भीष्म, व्यास यांसारख्या थोर प्रज्ञावंत पुरुषांनी केलेला हा उपदेश आहे. अर्जुन हा धर्मराजाला मारण्यास सिद्ध झाला त्या वेळी, 'अहिंसा हा माझ्या मते सर्वात श्रेष्ठ धर्म होय,' असे कृष्णाने त्याला सांगितले. -(कर्ण ६९); उलट कर्णवधप्रसंगी त्याने काय उपदेश केला ? अर्जुनाच्या एका बाणाने कर्ण घायाळ होऊन मूर्च्छित झाला. तेव्हा अशा स्थितीत त्याच्यावर दुसरा बाण टाकून त्याला ठार मारणे अर्जुनाला प्रशस्त वाटेना. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाला, 'अर्जुना, तू वेडा तर नाहीस ना ? अरे, शत्रू दुर्बल झाले म्हणजे केव्हाही ज्ञानी लोक त्यांचा नाश करण्यास विलंब लावीत नाहीत. बाबा रे शत्रूचा वध करणे तो विशेषेकरून तो संकटात असतानाच केला पाहिजे. शहाण्याने अशा स्थितीत शत्रूचा नाश केल्यास त्याजकडून धर्माचरण घडून शिवाय त्यास कीर्तीही मिळते, यास्तव, हे अर्जुना, तुझा बलाढ्य शत्रू जो कर्ण त्याला वधण्याची त्वरा कर.' -(कर्ण ९०).
 पितामह भीष्मांनी तर एके ठिकाणी असे स्पष्ट सांगितले आहे की "विजयाची इच्छा करणारे राजे धर्म व अधर्म या दोहोचेही