पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
६५
 

अवलंबन करून वागत असतात. केवळ धर्माचे अवलंबन केल्यास त्यांची कार्यसिद्धी होत नाही.” –(शांति ८०).
 अशी अनेक विसंगत, विरोधी वचने पाहिली म्हणजे ही नकळत, किंवा दुर्लक्षामुळे झालेली गोष्ट नसून त्या परस्पर- विरोधात काही तरी मोठा अर्थ आहे, असा उपदेश करण्यामध्ये या थोर पुरुषांचा काही तरी हेतु आहे असे निश्चित वाटू लागते. तो हेतु काय आहे व या विसंगतीचा अर्थ कसा लावायचा ते आता आपण पाहणार आहोत.
 सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शरणागताला अभय, ही अत्यंत श्रेष्ठ धर्मतत्त्वे होत यात शंकाच नाही. आणि मानवजातीला या तत्त्वांच्या उपदेशाचीच जास्त जरूर आहे हेही खरे आहे. पण जगात मानवी व्यवहाराकडे पाहिले म्हणजे अनेक वेळा असे ध्यानात येते की, प्रसंगी काही लोकांशी व्यवहार करताना या तत्त्वांच्या आचरणाला मुरड घातली नाही तर त्या तत्त्वांचा जो मूल-हेतू तोच विफल होतो. अहिंसेचे तत्त्व आपण निरपवाद रीतीने पाळू म्हटले तर त्यायोगे अहिंसा तर नाहीच पण उलट सर्व आप्तस्वकीयांची व शेवटी आपलीही हिंसा होण्याची वेळ येते. म्हणूनच आत्यंतिक अहिंसा हे शुद्ध पापकर्म असून हिंसा हा धर्म आहे असे श्रीकृष्णासारख्यांना सांगणे भाग पडते.
 भारती युद्धानंतर धर्मराजा हा त्या युद्धातील हिंसेच्या कल्पनेमुळे फार विव्हल झाला. तो म्हणाला, 'पितामहा, मी युद्धामध्ये असंख्य वीरांचा वध केला आहे आणि त्यांच्याविषयीचा विचार पुनः पुन्हा अंतःकरणात येऊन मला ताप होत आहे. या संहारामुळे ज्यांना आज पुत्र, पति आणि बंधू यांचा कायमचा वियोग झाला आहे त्या श्रेष्ठ स्त्रियांची काय बरे अवस्था होईल!
 ५...