पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

खरोखर आपल्या पुरुषांचा वध करणाऱ्या आम्हा पांडवांना शिव्याशाप देत त्या कृश व दीन स्त्रिया भूतलावर व्याकुळ होऊन पडतील; अथवा हे द्विजश्रेष्ठा, आपले पती, बंधू आणि पुत्र हे नाहीसे झालेले पाहून सर्वही स्त्रिया वात्सल्यामुळे प्राणत्याग करून यमनगरीस जातील आणि असे झाले म्हणजे धर्म हा सूक्ष्म असल्यामुळे आम्हांला स्त्रीवधाचे पातक लागेल.
 धर्मराजाचा हा विचार खरोखर मोठा उदात्त आहे व तो पाहून मानवी मन असेच असावे, शत्रूच्या स्त्रियांबद्दलही त्याला असेच कारुण्य असावे, यातच भूषण आहे, असे वाटू लागते. पण त्याबरोबरच हा विचार युधिष्ठिराने खरोखरच अमलात आणला असता तर काय झाले असते याचा जर आपण विचार करू लागलो तर ती उदात्तता टिकत नाही. शत्रूंना मारले तर त्यांच्या स्त्रिया विधवा होतील या भीतीने जर कोणी शत्रुवध करण्याचे नाकारील तर तो शत्रू त्या अहिंसापालकांच्या पक्षाच्या स्त्रियांना विधवा केल्यावाचून राहणार नाही. शत्रूच्या पोरांबाळांची दया केली, तर आपली पोरेबाळे अनाथ होण्याचा प्रसंग येतो. जगाचा न्याय असा कठोर असल्यामुळेच भारतीय थोर तत्त्ववेत्त्यांनी या धर्माच्या थोर तत्त्वांचा मोठा खोल विचार करून त्याच्या अगदी योग्य अशा मर्यादा कोणत्या त्या दाखवून दिल्या आहेत.
 अहिंसा, सत्य, दया यांचा एकांतिक उपदेश करणाऱ्याला जगात मोठी कीर्ती मिळते, सर्वत्र त्याची प्रशंसा होते, शत्रूही त्याचे गुणगान करितात हे खरे; पण प्रत्यक्ष व्यवहारात पाहिले तर असे दिसते की या प्रतिपादनामुळे तो स्वकीयांचा शत्रू ठरतो व त्यांच्या नाशाला कारण होतो. म्हणूनच या तत्त्वांच्या मर्यादेचे उल्लंघन करू नये असे महाभारतात सांगितले आहे.