पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
६७
 


द्विविधनीती : गृहनीती व परनीती

 या मर्यादेमुळेच नीतीला द्विविध रूप येते. एक गृहनीती व एक परनीती. आपला देश, राष्ट्र किंवा राज्य यातील जे लोक किंवा कोणत्याही अन्य कारणाने ज्यांना आपण स्वकीय समजतो, ज्यांचे आपले सुखदुःख एक आहे असे आपण समजतो, त्यांच्याशी वागण्याचे जे नियम, जे धोरण, ती गृहनीती व ज्यांना आपण परकीय समजून शत्रुसम लेखतो- मग ते कोठलेही असोत- त्यांच्याशी वागण्याचे जे नियम ती परनीती होय. त्यांतील पहिल्या प्रकारच्या म्हणजे गृहनीतीमध्ये सत्य, न्याय, अहिंसा, दया, क्षमा या तत्त्वांचा जितका उत्कर्ष होईल तितका भूषणावहच होय असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत आहे. ज्यांना आपण स्वकीय म्हटले त्यांच्यासाठी कोणताही त्याग हा कमीच ठरेल. असा त्याग करणे हा आपला धर्मच आहे. त्याला जो सिद्ध होणार नाही तो मानव अधम होय असे महाभारतात ठायी ठायी सांगितलेले आढळते. उलट जो शत्रू आहे, जो आज ना उद्या आपला, आपल्या प्रजेचा, राष्ट्राचा घात करील अशी आपली खात्री आहे त्याच्याशी वागताना कोणत्याही प्रकारच्या सत्यासत्याचा, धर्माधर्माचा विचार करू नये, जितके कठोर, क्रूर, कपटी होता येईल तितके होऊन शत्रूचा नायनाट करावा आणि असे करण्यातच धर्माचरण आहे असा भारती तत्त्ववेत्यांनी मोठ्या निर्भयपणे उपदेश केला आहे.

पृथक क्षेत्रे

 महाभारतप्रणीत गृहनीतीचा प्रथम विचार करून नंतर आपण परनीतीचा परामर्श घेऊ. येथे जी गृहनीती किंवा परनीती सांगितली आहे ती मुख्यतः राजाला म्हणजे राष्ट्राच्या पालनकर्त्याला उद्देशून