पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

सांगितलेली आहे. व्यक्तीने ते सिद्धांत जसेच्या तसे अनुसरावे असे म्हटल्यास अर्थाचा अनर्थ होईल. "जी कृत्ये आम्ही राष्ट्रासाठी करतो ती आम्ही स्वतःच्या वैयक्तिक संसारासाठी केली तर आम्ही बदमाष ठरू." असे काव्हूरने म्हटले आहे. महाभारतातील हे नीतिप्रकरण वाचताना हेच धोरण ठेविले पाहिजे. प्रजेचे पालन करणे, राष्ट्रात उत्तम व्यवस्था ठेवणे, शासन व्यवस्थित चालू ठेवून बळी तो कानपिळी हा जो मात्सन्याय तो नष्ट करून टाकणे, प्रजा उत्सन्न न होऊ देणे, हे राजाचे आद्यकर्तव्य होय. ते त्याने न केले तर असे पातकच नाही की जे लोक करणार नाहीत. त्यामुळे जगावर कल्पान्त ओढवेल, सर्वच धर्म उत्सन्न होऊन जाईल, माणसे पशू होतील. म्हणून काय वाटेल ते करून शासन हे टिकविलेच पाहिजे, असा भारतकारांचा कटाक्ष आहे. ते टिकविल्यानंतर त्याच्या कक्षेच्या आत मानवाने आपल्या मनाची उदारता, त्यागवृत्ती जितकी व्यापक करणे शक्य आहे तितकी करावी, तोच खरा धर्म होय असे महाभारताचे प्रतिपादन आहे. इतकेच नव्हे तर शत्रुभाव धारण करणारे लोक वगळून बाकीच्या विश्वातील सर्व मानवांच्यापर्यंत आपल्या औदार्याची कक्षा विस्तृत करावी असाही उपदेश त्यांनी केला आहे.
 महाभारतात हे प्रकरण राजाला उद्देशून आहे म्हणून वर सांगितले. सध्याच्या युगात राष्ट्रकार्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. मागल्या काळी ती फक्त राजावर होती. तेव्हा राजाला जी तत्त्वे सांगितली आहेत ती राष्ट्रकार्यार्थ सांगितली आहेत हे ध्यानात घेऊन राष्ट्रकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही गृहनीती व परनीती अनुसरिली पाहिजे. ती व्यक्तीसाठी नाही याचा अर्थ ती व्यक्तीच्या खासगी संसारासाठी नाही. राष्ट्रीय संसारात पडणाऱ्या प्रत्येक