पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
६९
 

व्यक्तीला तिचा अवलंब करणे अवश्यच आहे. त्यातूनही व्यक्तीला खासगी संसारात सर्वथा निषिद्ध अशी फक्त परनीतीच होय. गृहनीतीचे रूप इतके उदात्त आहे की प्रत्येक व्यक्ती ती आपल्या खासगी संसारात आचरणात आणील तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरण्यास मुळीच वेळ लागणार नाही.
 त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे. स्वकीय कोण व परकीय कोण याचे काही निश्चित असे नियम ठरले आहेत असे समजणे चूक होईल. साधारणत: आपल्या समाजाचे रक्षण, त्याचा उत्कर्ष यांच्या आड जो येईल तो 'पर' व यासाठी जो साह्य करील तो 'स्व' असा दंडक मानता येईल, श्री शिवछत्रपतींना राष्ट्रकार्य करावयाचे असल्यामुळे चंद्रराव मोरे, बाजी घोरपडे यांनाही पर मानून त्यांचा वध करावा लागला. आपला सावत्र भाऊ व्यंकोजी यावर चाल करावी लागली. इतकेच नव्हे तर दिलीरखानाला मिळून संभाजीने भूपाळगडला वेढा घातला त्या वेळी त्याच्यावर गोळा टाकला नाही म्हणून फिरंगोजी नरसाळ्याची निर्भर्त्सना राजश्रींना करावी लागली. यावरून 'स्व' आणि 'पर' चा उलगडा होईल. पांडव व कौरव हे भाऊ भाऊ होते. असे असून श्रीकृष्णाने कौरवांना परनीती कशी लागू केली अशी शंका येईल म्हणून हे विवेचन केले आहे. पण या विवेचनात खोल जाण्याचे हे स्थळ नव्हे. ज्यांना आपण 'स्व' मानतो त्यांच्याशी कोणत्या नीतीने वागावे व 'पर' मानतो त्यांच्याशी कसे वागावे याचे विवेचन येथे आहे. 'स्व' कोण व 'पर' कोण हे ठरविणे हे स्वतंत्र शास्त्र आहे.

गृहनीती

 गृहनीतीमध्ये पितामह भीष्मांनी राजाला व पर्यायाने सर्व