पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

राष्ट्रहितचिंतकांना पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे. 'राजाने सदैव गर्भिणी जसे आपल्या गर्भाचे पालन करते त्याप्रमाणे प्रजेचे पालन केले पाहिजे. ज्याप्रमाणे गर्भिणी आपल्याला स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींचा त्याग करून आपल्या गर्भाला हितकारक तेच करते त्याप्रमाणे, कुरुश्रेष्ठा, धर्माच्या अनुरोधाने वागणाऱ्या राजानेही निःसंशय तसेच वागले पाहिजे. म्हणजे आपल्याला इष्ट असतील या गोष्टींचा त्याग करून जी जी गोष्ट लोकहिताची असेल ती ती त्याने केली पाहिजे. ज्ञानसंपन्न अशा राजाने चारही वर्णांवर सदैव दया केली पाहिजे. राजा धर्मात्मा व सत्यवक्ता असेल तरच प्रजेचे रंजन होते.-' (शांति ५६). 'कोप न करणारा, व्यसनशून्य, सौम्य शिक्षा करणारा आणि जितेन्द्रिय असा राजा असला म्हणजे हिमालयपर्वताप्रमाणे तो लोकांच्या विश्वासास पात्र होतो. ज्याच्या राज्यात प्रजा आपल्या पित्याच्या घरात असल्याप्रमाणे निर्भयपणे संचार करीत असतात तोच राजा सर्वांत श्रेष्ठ होय. ज्याच्या राज्यामध्ये वास करणारे लोक आपल्या कर्मामध्ये आसक्त, केवळ आपल्या शरीरावरच प्रेम न करणारे, वश्य, शिक्षा मान्य करणारे, आज्ञेत राहणारे, दुसऱ्याला पीडा देण्याची इच्छा न करणारे आणि सत्पात्री दान करण्याची आवड असलेले असे असतात तोच खरा पृथ्वीपती होय.-' (शांति ५७) 'राजाची उत्पत्ती धर्मासाठीच आहे; आपल्या इच्छा तृप्त करण्यासाठी नाही. जो लोकांचे संरक्षण करतो तोच राजा होय हे तू लक्षात ठेव. धर्म हा सर्व प्राण्यांना आधारभूत असून राजा हा धर्माला आधार आहे.' असा आंगिरस कुलोत्पन्न उतथ्यमुनीने उपदेश केला आहे. (शांती ९०) त्याचप्रमाणे वामदेवाने असे सांगितले आहे की, 'राजाने (कोणाही राष्ट्रहितचिंतकाने), लोकांनी प्रार्थना केल्यावाचून त्यांचे प्रिय