पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
७३
 

पक्षिघातक व्याध त्याच वेळी हिंडत होता. तो थंडीने, पावसाने अगदी मृतवत झाला होता तरी तेवढ्यात त्याने त्या कपोतीला वरून पिंजऱ्यात घातले. पण पुढे त्राण न राहून तो तेथेच गारठून जाऊन भूमीवर पडला. कपोतीच्या शोधार्थ कपोत तेथे आल्यावा त्या व्याधाचा सूड घेण्यास सांगण्याऐवजी त्या कपोतीने 'हा अतिथी आहे याचा सत्कार करा' असे पतीला सांगितले. कपोताला पत्नीचे हे उदारवचन ऐकून आनंद झाला व त्याने शेकोटी करून त्या व्याधाला शेकण्याची सोय करून दिली व तो शुद्धीवर येताच 'आपणांस आणखी काय पाहिजे?' असे त्यास मोठ्या आदराने विचारले. त्यावर 'मला क्षुधा फार लागली आहे, तेव्हा मलर काही खावयास दे,' असे व्याधाने सांगितले. हे ऐकून कपोत फार खिन्न झाला. कारण व्याधाला खावयास देण्यास त्याच्यापाशी काहीच नव्हते. अतिथीची इच्छा आपणास तृप्त करता येत नाही. हे पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. इतक्यात त्याला एक युक्ती सुचली, व तुझी क्षुधा मला माझ्या देहदानाने शांत करता येईल असे म्हणून त्याने अग्नीत उडी घातली.
 ते पाहून तो व्याध पराकाष्ठेचा दुःखी झाला. आयुष्यभर केलेल्या हत्येचा त्यास पश्चात्ताप झाला. त्याचे मन शुद्ध झाले, त्याच्या साऱ्या हिंस्रवृत्ती नष्ट झाल्या व एका क्षणात त्याच्या मनात फार मोठे परिवर्तन घडून आले. हीन, अधम, हत्यारी असा तो व्याध नष्ट होऊन थोर, शुद्धचित्त व उदार असा एक नवीनच पुरुष कपोताच्या त्या आत्मार्पणातून निर्माण झाला.
 कपोताची ही कथा म्हणजे परमथोर, परमउदात्त अशां मानवधर्माचे अगदी सार आहे. मानवाच्या विशालतेची कक्षा याहून मोठी असूच शकणार नाही. अहिंसा, त्याग, सत्याने असत्य