पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

जिंकणे, आत्मार्पणाने शत्रूला जिंकणे, पापावर पुण्याचा विजय, इत्यादी उदात्त तत्त्वांचे इतके उत्कृष्ट उदाहरण दुसरे सापडणे जवळ जवळ अशक्य आहे. आणि अशी ही कथा महाभारतात सांगून तिचा नित्य पाठ करण्याचा उपदेश केला आहे यावरून भारतीय तत्त्ववेत्त्यांची सत्यावरील भक्ती च धर्मावरील निष्ठा अत्यंत उज्ज्वल अशी होती याविषयी कोणाला शंका येण्याचे कारण रहणार नाही.

ध्येय व व्यवहार

 पण हा उदात्त उपदेश करीत असताना भारतकार हेही विसरत नाहीत की, मानवप्राणी हा इतक्या वरच्या पातळीत जवळ जवळ कधीच नसतो. कपोताने आपल्यासाठी आत्मार्पण केलेले पाहून एकदम धक्का बसून, हीनत्व सांडून आपल्या मनाचे परिवर्तन करून टाकणारे व्याध जगात बहुसंख्य नसून, कपोताने अग्नीत उडी टाकली आहे त्यामुळे त्याची बायकापोरे आयतीच आपल्या हाती सापडतील, तेव्हा याच्याबरोबर त्यांचीही होळी करून चांगले भोजन करण्यास काही हरकत नाही, असे म्हणणारे लोकच जगात जास्त असतात. आणि म्हणूनच वरीलसारखे शत्रूसाठीही आत्मार्पण करण्याचे प्रसंग अपवादभूत असतात हे विसरून त्याचा राष्ट्रीय प्रपंचात आपण उपदेश करू लागलो तर सर्व राष्ट्राची होळी झाल्याखेरीज राहणार नाही, हे भारतीय तत्त्ववेत्त्यांनी अनेकवार बजाविले आहे.
 स्वकीयांसाठी असला त्याग हा दरघडी केला तरी तो अभिनंदनीयच आहे. क्वचितप्रसंगी शत्रूही अशा त्यागाने मोहित होऊन मित्र बनतो. पण ते फार क्वचित. म्हणूनच त्याच्याशी वागण्याचे नीतिनियम अगदी वेगळे होत. त्या नियमावलीलाच परनीती असे