पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 


शत्रुसंहार अटळ

नाघ्नतः कीर्तिरस्तीह न वित्तं न पुनः प्रजाः
इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपद्यत । -शांति. १५/१५
नाच्छित्वा परमर्माणि नाकृत्वा कर्म दारुणम्
नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रेयम् ।

- शांति. १४०/५०

 शत्रूचा वध न करणाऱ्या राजाला या लोकी कीर्ती लाभणार नाही, धन मिळणार नाही, आणि त्याची प्रजाही सुरक्षित राहणार नाही. इंद्रसुद्धा वृत्रासुराचा वध करूनच महेन्द्र पदवीला पोचला. शत्रूच्या मर्मस्थानावर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय आणि मासे मारणाऱ्या कोळ्याप्रमाणे हत्या केल्याशिवाय राज्यलक्ष्मीचा लाभ होत नाही; असा महाभारतकारांचा राजनीतीचा पहिला सिद्धांत आहे. आणि म्हणूनच पितामह भीष्मांनी अहिंसावादी युधिष्ठिराला पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे
 'राजा,- व्यवहारदृष्टीचा लोप झाला तर राजाला स्वर्गाची व कीर्तीची प्राप्ति कशी होणार? राजाने शत्रूच्या नाशाकरिता त्याच्या द्रव्यादिकांचा अपहार करावा व त्याच्या देशात प्रवेश करून तो प्रदेश दग्ध करून टाकावा. शेतांतील धान्ये जाळून टाकावी, शत्रूच्या लोकांत फाटाफूट करून त्यांच्याचकडून अथवा आपल्या सैन्याकडून त्या सर्वांचा नाश करवावा. नदी-वरून गमन करण्याचे जे पूल वगैरे मार्ग असतील ते मोडून टाकावे. तलावादिकांतील सर्व जल फोडून देऊन नाहीसे करावे व ते फोडून देता येत नसेल तर विषादिकांच्या योगाने दूषित करावे. – (शां. ६९). हे राजा, स्वकार्य करण्याविषयी प्रवृत्त झालेल्या राजाने शत्रूंना वश करून नंतर त्यांचा वध करावा.