पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
७७
 

शत्रूंना पीडा देणाऱ्या राजाने सदैव स्वस्थ झोप घेत राहू नये. कारण ठिणग्यांचा जसा अग्नि होतो तसा पीडित केलेला शत्रूही प्रबल होऊ शकतो. विजय मिळणे अनिश्चित असल्यास शत्रूवर चालून जाऊ नये. तर, हे प्रभो, कारस्थानी अशा अमात्यांच्या साह्याने काय करावयाचे ते ठरवून, काही द्रव्य देऊन, विश्वास दाखवून शत्रूला वश करून घ्यावे व तो पराजित केलेला नाही हे मनात ठेवून त्याची आपण उपेक्षा करीत आहो असे बाहेर दाखवावे. पुढे त्याचे पाय किंचित डळमळू लागले की संधी साधून त्याजवर प्रहार करावा. विश्वासाने काम करणाऱ्या हेरांकडून त्याच्या सैन्यात फंदफितूर करावा. भेद, दान, औषधी यांची त्याजवर योजना करावी. शत्रूविषयीचा द्वेष मनांत गुप्त ठेवावा आणि संधी साधण्याची वाट पाहात राहावे. आणि संधी येताच शत्रूस ठार करावे. संधी येण्याची वाट पाहात असताना शत्रूचा आपल्यावर विश्वास बसेल अशा तऱ्हेच्या आचरणात कालक्षेप करावा. शत्रूवर एकदम शस्त्रप्रहार करू नये, विजय मिळणे अनिश्चित आहे हे लक्षात ठेवावे. शत्रूस होणारी पीडा कमी होऊ देऊ नये व कठोर शब्दांनी त्याच्या अंतःकरणास छिद्रेही पाडू नयेत. पण संधी आली की त्याजवर शस्त्रपात केल्याखेरीज राहू नये.' -(शांति. १०३)

कपटनीतीचा अवलंब

 शत्रूचा कोणत्या ना कोणत्या उपायाने संहार केलाच पाहिजे हे महाभारतात अगदी निक्षून सांगितले आहे. तो संहार करण्यासाठी वाटेल त्या नीतीचा अवलंब करावा, वाटेल ते कपट करावे, असा त्यांचा अभिप्राय आहे. इंद्राला देवगुरु बृहस्पती ने पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे.