पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 'शत्रूवर नानाप्रकारचे मायावी प्रयोग करावे. त्याचा जो शत्रू असेल त्याला त्याचेवर उठवावा व कपटाचेही आचरण करावे. मात्र त्या कपटामुळे आपल्या कीर्तीस बाध येईल असे होऊ देऊ नये. विश्वासू मनुष्याकडून शत्रूच्या लोकांना वश करून घ्यावे. हे वृत्रनाशका इंद्रा, पूर्वीदेखील आपल्या नगरामध्ये योग्य अशा नीतीचा अवलंब करून राजे लोकांनी शत्रूला जिंकले आहे. हे राजा, आपल्या अमात्यादिकांना गुप्तपणे द्रव्य देऊन व त्यांचे वेतन बंद करून, ते आपल्या अपराधामुळे मर्जीतून उतरलेले आहेत,' असे प्रसिद्ध करावे व त्यांची योजना शत्रूची नगरे व राज्ये यांजवर करावी. पूर्वीच्या राजांनी असे आचरण केलेले आहे.' (शांति. १०३)

निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चयः
नहि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते ।

-वन. ५२/२२

 'कपटबुद्धी शत्रूचा कपटानेच वध कैला पाहिजे, असा सिद्धांत आहे. कपटी शत्रूचा कपटाने वध केला असता त्याला पाप म्हणत नाहीत.' असे भारतीय पुरुषांचे मत आहे. म्हणूनच या राजनीतीचा त्यांनी पुनः पुन्हा उपदेश केला आहे. कालकवृक्षीय मुनी क्षेमदर्शी राजाला सांगतात, 'हे राजा, प्रथम अत्यंत उत्कृष्ट प्रकारे शुचिर्भूत राहून व चांगली कर्मे करून तू शत्रूची मर्जी संपादन कर. व तुला मित्रांचे पाठबळ मिळाले म्हणजे उत्कृष्ट प्रकारची मसलत करणाऱ्या मंत्र्यांच्या साहाय्याने गुप्त विचार करून आपल्या विश्वासू लोकांकडून शत्रूंमध्ये फाटाफूट कर. आणि ज्याप्रमाणे बेलफळाने बेलफळ तोडतात त्याप्रमाणे तू शत्रूकडून शत्रूंचा नाश कर. राजा, सुंदर आणि दुर्लभ असे पदार्थ, स्त्रिया,