पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एवढा थोर उद्योग केला, भीष्मप्रभृती कौरवांचा निःपात उडविला, जय मिळविला, उज्ज्वल कीर्ती पसरली, आणि वैराचे उसने पुरेपूर निघाले. एवढे सर्व होऊन विजय अगदी हातात आल्यासारखा झाला असता धर्मराजाने तो धोक्यात घातला. खरोखर, अर्जुना, धर्माला ही मोठीच दुर्बुद्धी आठवली. अशाप्रकारचे हे घोर युद्ध करून जे मिळविले ते, 'केवळ एकाला जिंकले असता हारवीन,' असे म्हणून त्याने हे युद्ध पणास लावले, तेव्हा त्याला काय म्हणावे ? दुर्योधन हा मोठा घटलेला वीर आहे. शिवाय त्याचे काय, तो जिवावर उदार झालेला आहे. जिवावर उदार झालेले साहसी पुरुष थोडे असले तरी ते बहुतांस भारी असतात. एक मारीन किंवा मरेन, अशा निश्चयाने जे धाडशी लोक युद्धात उडी घेतात. त्यांच्यापुढे उभा राहण्यास इंद्रही समर्थ नाही. अर्जुना, सांप्रत सुयोधनाची तशी स्थिती आहे. तो जिवावर उदार झालेला आहे. अशा स्थितीत कोणता शहाणा माणूस त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान करील ? आज तेरा वर्षे सुयोधन सारखा गदायुद्धाचा सराव करीत आहे आणि तो पहा भीमसेनास ठार मारण्याच्या हेतूने ऊर्ध्व, तिर्यक असा सारखा फिरत आहे. छे छे ! पार्था जर महाबाहू भीमसेन याला अन्यायाने ठार न करील तर आज दुर्योधनच विजयी होईल.' -(शल्य. ५७).
 यानंतर गदायुद्धात भीमाने दुर्योधनाच्या मांड्या प्रतिज्ञेप्रमाणे फोडून त्याला ठार मारले. त्या वेळी बलराम फार क्रुद्ध झाले. अधर्माने युद्ध केले म्हणून त्यांनी भीमाची व पांडवांची फार निंदा केली. दुर्योधन खाली पडल्यावर भीमाने त्याच्या मस्तकावर लाथ मारली. तेव्हा युधिष्ठिरालाही न्यायनीतीची लहर येऊन तोही. भीमाची निर्भर्त्सना करू लागला. या योगाने विजयी होऊनही
 ६...