पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

पांडव हे अगदी लज्जित झाले. त्यांची वदने खिन्न झालेली पाहून मेघ व दुंदुभी यांच्यासारख्या गंभीर वाणीने श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, 'पांडवहो, तुम्हांस खिन्न होण्याचे कारण नाही. वेळोवेळी मीच युक्तिप्रयुक्तीने तुमच्या हितार्थ रणामध्ये या कौरवांचा असा निःपात करण्यास सांगितले होते. या शत्रूंना असे मारले ही गोष्ट तुमच्या मनाला लागून राहण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही हे मुळीच मनात आणू नका, शत्रू पुष्कळ व अधिक बलवान असले म्हणजे ते अशाच उपायांनी मारावे लागतात. असुरास मारणाऱ्या देवांपासून हा असाच मार्ग चालत आला आहे. आणि याच संतसंमत मार्गाने सर्व चालतात.

'पूर्वैरनुगतो मार्गो देवैरसुरघातिभिः
सद्भिश्चानुगतः पन्थाः सर्वैरनुगमिष्यते ' -(शल्य ६१)

आज आपण कृतकृत्य झालो आहोत. तेव्हा आता शिबिरास जाऊ व विश्रांती घेऊ.'
 वासुदेवाचे हे भाषण ऐकून पांचालासह पांडव अत्यंत हर्ष पावले व सिंहासारख्या गर्जना करू लागले. दुर्योधन मेलेला पाहून आनंदित झालेल्या त्या लोकांनी मग शंख फुंकले. व माधवानेही आपला पांचजन्य शंख फुंकला !
 श्रीकृष्णाच्या वरील भाषणावरून परनीतीसंबंधी त्यांचा काय अभिप्राय होता हे स्पष्ट होईल.

परनीतीच्या अभावी -

 पांडवांवर ओढवलेले प्रसंग पाहिले, आणि दर वेळेस योग्य परनीतीचा धर्म सांगून त्यांना श्रीकृष्णांनी कसे वाचविले ते ध्यानात