पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

त्यांच्यांत व इतरांत विवाह होऊ नयेत असे हिटलरच्या जर्मनीत सांगत असत. त्याचप्रमाणे लोकशाही ही विघातक असून एकशाही हीच श्रेष्ठ होय, प्रत्येक युगात कोणी तरी श्रेष्ठ नेता निर्माण होतच असतो, त्याच्यामागे बिनतक्रार सर्वांनी जाणे यातच राष्ट्राचे कल्याण आहे, असेही तेथे शिकविले जात असे. हे सर्व जर्मनीचे त्या काळी राष्ट्रीय तत्त्वज्ञान होते. रशियाचे तत्त्वज्ञान निराळे आहे. रक्तावर काहीच अवलंबून नाही, अर्थ-निर्मितीची साधने समाजाच्या संस्कृतीचे नियमन करतात; वंश, धर्म ही सर्व स्वार्थी लोकांनी माजविलेली ढोंगे आहेत, ती नष्ट करून त्यांमुळे निर्माण झालेले वर्गही नष्ट केले व वर्गविहीन समाज केला तर मानवाची प्रगती होईल अन्यथा होणार नाही, असे सिद्धान्त रशियात सांगितले जातात. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, इटालियन, असले राष्ट्रवार विभाग करणे चूक असून भांडवलदार व कामगार असे जगात दोनच वर्ग असतात, तेव्हा जगातल्या कामगारांनी राष्ट्रविचार मनात न आणता सर्वांनी एक झाले पाहिजे असा विचार तेथे सांगितला जातो. हे सर्व रशियाचे तत्त्वज्ञान आहे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या आधी, राजशाही, जन्मजात उच्चनीचता हे तत्त्वज्ञान प्रचलित होते, तर राज्यक्रान्तीने समता, बंधुता, स्वातंत्र्य हे तत्त्वज्ञान प्रचलित केले व ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. फ्रेंच राष्ट्राचे आजही तेच तत्त्वज्ञान आहे.
 साधारणतः प्रत्येक राष्ट्राचे असेच काही तरी तत्त्वज्ञान ठरलेले असते आणि त्यातील सिद्धान्ताप्रमाणे त्याचा अर्थ ज्याला जसा समजेल त्याप्रमाणे- त्या देशातील बहुजनसमाज वागत असतो. हे तत्त्वज्ञान म्हणजे राष्ट्राच्या उत्कर्षासंबंधी त्या त्या देशातील तत्त्ववेत्त्यांनी स्वतःच्या समजुतीप्रमाणे ठरविलेले सिद्धान्तच असल्यामुळे त्या तत्त्वज्ञानावर राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते असे म्हणण्यास