पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
८३
 

घेतले म्हणजे मनात निःसंशय असे येऊ लागते की, श्रीकृष्णासारखा नीतिविशारद धर्मवेत्ता पुरुष त्यांचा पाठीराखा नसता तर धर्मराजाने आपल्या सत्यअहिंसेने पांडवांचा कायमचा घात करून त्यांच्या हाती कायमची नरोटी दिली असती. सुदैव असे की श्रीकृष्णासारखा व्यवहारज्ञ सखा त्यांना मिळाला. आणि त्याहीपेक्षा सुदैव असे की त्याचे ऐकण्याची मधून मधून तरी धर्मराजाला बुद्धी होत असे.

सामोपचार-मर्यादा

 शत्रूंचा संहार करावा, त्याशी कपटाचे वर्तन करावे असा उपदेश केला असला तरी या लोकांना युद्धाची भलतीच हौस होती असे मात्र समजू नये. युद्ध शक्य तो करून टाळावे असाच त्यांनी उपदेश केला आहे. युधिष्ठिराला नारद म्हणतात, "हे शत्रु तापना, युद्ध करून रक्तपात करणे हे होता होईल तो टाळले पाहिजे. यास्तव हे शत्रुनाशना, शत्रूच्या नाशास उद्युक्त झाल्यावर प्रथम साम, दाम, भेद हे उपाय योजावे. या उपायांची उत्तम प्रकारे योजना केल्याने प्राणहानी न होता आपला उद्देश सिद्धीस जातो. हे प्रजापालका, तू असेच धोरण ठेवतोस ना ?" -(सभा. अ. ५) पितामह भीष्मांनीही युद्ध शक्यतो टाळावे असाच उपदेश केला आहे. 'युधिष्ठिरा, तू प्रचंड चतुरंग सेनेचे पोषण करून प्रथम सामोपचाराचेच वर्तन ठेव. आणि त्याचा उपयोग न होईल तर युद्धाविषयीचा प्रयत्न कर. कारण हे भारता, युद्धातील जय हा निकृष्ट प्रतीचा आहे. तो साहाजिक रीतीने किंवा दैवयोगाने मिळतो असे तज्ज्ञ लोकांचे मत आहे. हे राजा, अत्यंत बलसंपन्न असणारी सेनाही हरिणसमूहासारखी असते; अर्थात हरिणांपैकी एक पळू लागला की ज्याप्रमाणे दुसराही त्याच्यामागून पळू लागतो त्याप्रमाणेच