पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
८७
 

दाखविणे हे राजनीतीतले पाठ आहेत; त्याचप्रमाणे आपण दुर्बल असताना शत्रूपुढे नमून वागणे व वेळ येताच उलटणे हाही पाठ या राजनीतीत सांगितला आहे.

प्रसंगी हेही अवश्य

 बृहस्पतीने इंद्राला पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे : 'शत्रू जर अवेळीच आपल्यावर चालून आला, तर त्या वेळी आपले सामर्थ्य बाजूला ठेवावे, आणि सुज्ञ पुरुषांना संमत असलेल्या मार्गाचे अवलंबन करून त्याच्याशी स्नेह करावा. पीडा कोणत्याही प्रकारे देऊ नये आणि क्रोध व अहंकार यांचा त्याग करून त्याच्या छिद्रांचा शोध करीत राहावे. अशा रीतीने प्रसंग आला असता बलाढ्य शत्रूशी नम्रतेने वागणेच योग्य होय. नंतर शत्रू अनवधानतेने वागत असता अवधानपूर्वक त्याचा वध करण्याची संधी पाहात राहावे. प्रणाम, अन्नपान, व मधुर भाषण या मार्गांनी शत्रूशी स्नेहसंबंध ठेवावा. त्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी केव्हाही शंका येऊ देऊ नये. संशय येण्याजोगी जी कृत्ये असतील त्यांचा त्याग करावा. त्या शत्रूवर मात्र राजाने कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये. अवमान झालेले राजे या गोष्टीविषयी जागरूक असतात. अर्थात शत्रूचा आपणांवर विश्वास बसवून घेण्यासाठी दक्ष असतात पण आपण मात्र त्यांजवर विश्वास ठेवीत नाहीत. हे सुरश्रेष्ठ इंद्रा, राजांचे ऐश्वर्य टिकविणे, यासारखे दुसरे दुष्कर कर्मच नाही. यासाठी राजाने नेहमी सावध असले पाहिजे. अनवधानाने वागणाऱ्या राजाचे राज्य तत्काल नष्ट होते.
 इंद्रा, पुष्कळ शत्रू असले तर त्यांच्याशी एकट्यानेच लढू नये. त्या वेळी साम, दाम, भेद व दंड या उपायांचे अवलंबन करून