पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

क्रमाक्रमाने एकेकाचा विध्वंस करावा. आणि त्यांतूनही अवशिष्ट राहिले तर त्यांच्याशी लक्ष्यपूर्वक वागावे. सामर्थ्य असले तरीही बुद्धिमान पुरुषाने सर्वांशी युद्ध करण्याचा प्रसंग आणू नये. ज्या वेळी अश्व, गज, रथ, यांनी परिपूर्ण, पायदळ व यंत्रे विपुल असलेली, व आपल्यावर भक्ती असलेली अशी प्रचंड सेना जवळ असेल व शत्रूपेक्षा आपला अनेक प्रकारे उत्कर्ष आहे अशी खात्री होईल तेव्हा आपला अभिप्राय प्रकट करून शत्रूवर निःशंकपणे प्रहार करावा व त्याचा निःपात करावा. १- (शां. १०३ )

धर्मापेक्षा बल श्रेष्ठ

 जय धर्मामुळे मिळत नाही; बलामुळे मिळतो. शत्रूशी सामना देताना न्यायनीतीचा विचार करणे हे आत्मघातकी का ठरते त्याची मीमांसाही भारतीय तत्त्ववेत्त्यांनी केली आहे. सत्यमेव जयते, नहि सत्यात् परो धर्मः | असा उपदेश त्यांनी अनेक वेळा केला असला तरी तो गृहनीतीचा भाग आहे हे आपण विसरू नये अशी त्यांची इच्छा आहे. कारण गृहनीती व परनीती या अगदी निराळ्या आहेत. जगाच्या व्यवहारात सत्य, धर्म, न्याय यांनी जय कधीही मिळत नाही ही भारती तत्त्ववेत्त्यांची बालंबाल खात्री होती. पितामह भीष्म सांगतात, 'युधिष्ठिरा, आपत्प्रसंगी धर्म व अधर्म यांचा विचार करीत बसणे म्हणजे अरण्यात एखाद्या पशूचे पाऊल उठले असता ते लांडग्याचे आहे, चित्त्याचे आहे का वाघाचे आहे असा विचार करीत बसण्यासारखेच व्यर्थ आहे. या लोकांत धर्माचे अथवा अधर्माचेही फल कोणी प्रत्यक्ष पाहिलेले नाही, यास्तव तिकडे लक्ष न देता सामर्थ्यप्राप्तीची इच्छा करणे योग्य होय. कारण हे सर्व जग बलाढ्य पुरुषांच्याच आधीन असते. सामर्थ्य-