पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

मुरड यासाठी घालावी लागेल ती घातली पाहिजे, कारण असे न करावे तर सत्य, धर्म यांचाच सर्वस्वी उच्छेद होतो. कारण बलहीनाचे सत्य कोण ऐकणार, आणि त्याचे धर्माचरण तरी कोण चालू देणार !
 आणि जगाची अशी स्थिती असल्यामुळे, म्हणजे सत्य, धर्म यावर विजय अवलंबून नसल्यामुळे, तो सर्वथा बलाच्या, मनगटाच्या बलाच्या अधीन असल्यामुळे, नीतिशास्त्रात आपल्याला एरवी अप्रिय वाटणाऱ्या तत्त्वांचा समावेश करावा लागतो.

अविश्वास

संक्षेपो नीतिशास्त्राणामविश्वासः परो मतः । -(शां. १३८|१९७)

हे तत्त्व अशापैकीच आहे. सर्व नीतिशास्त्राचे -परनीतीचे -थोडक्यात सार हेच की, कोणाचा विश्वास म्हणून धरू नये.
 एरवीच्या जीवनात आपल्याला नेहमी सद्गुणांची वाढ करावयाची असते. त्यामुळे दुसऱ्यावर विश्वास टाकून, त्याला मोठेपणा देऊन, त्याचे मन वळवावे असा उपदेश केला जातो, आणि तो अगदी योग्यच आहे. पण राजकारणात शत्रूशी वागताना हे धोरण घातकी ठरल्यावाचून राहणार नाही. महाभारतात याविषयी पुढीलप्रमाणे उपदेश केलेला आढळतो.
 'आपले व आपल्या शत्रूचे कार्य एकच असले तर बलाढ्य शत्रूशी संधी करून सावधपणे व युक्तीने ते कार्य साधावे. पण कार्य झाले म्हणजे मात्र त्या शत्रूवर विश्वास ठेवू नये. आपल्यावर ज्याचा विश्वास नसेल त्याच्यावर विश्वास ठेवू नयेच पण आपल्यावर विश्वास आहे त्याच्यावरही विश्वास ठेवू नये.