पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

बाळगून सावधानपणे कार्यामध्ये आसक्त होऊन राहिले म्हणजे विचारहि सुचतात. कारण, हे राजा, संकट उत्पन्न होण्यापूर्वी जरी भीति बाळगून वागत असलो तरी ती खरी नसते. पण जो भीति न बाळगता विश्वासाने राहतो व सदैव निर्भयपणे वागतो त्याजवर पुढे मोठे संकट ओढवते.' -(शांति अ. १३८)
 ब्रह्मदत्त व पूजनी यांच्या संवादात (शां. अ. १३९) असेच विचार प्रगट झाले आहेत.

निश्चयः स्वार्थशास्त्रेषु विश्वास सुखोदयः । - शां. १३९।७०

 स्वार्थशास्त्राचा म्हणजे राजनीतीशास्त्राचा असा सिद्धांत आहे की दुसऱ्यावर विश्वास ठेवणे हे सर्व दुःखांचे उत्पत्तिस्थान आहे. याविषयी शुक्राने प्रल्हादाला दोन गाथा सांगितल्या होत्या. जे लोक शत्रूच्या सत्य अथवा असत्य भाषणावर विश्वास ठेवतात ते, मधाच्या आशेने जाणाऱ्या व मध्येच शुष्क तृणांनी आच्छादिलेल्या कड्यांवरून पडणाऱ्या लोकांप्रमाणे नाश पावतात. राजाने कोणाचेही वाईट केल्यानंतर त्यावर विश्वास ठेविला तर दुःख भोगावे लागते. -(शां. १३९).
 गृहनीती व परनीती यांची पृथक् क्षेत्रे आरंभीच सांगितली आहेत. पुष्कळ वेळा इकडचे तत्त्व तिकडे व तिकडचे धोरण इकडे असा माणसांच्या मनांत घोटाळा निर्माण होतो व पुष्कळ वेळा याविषयी निश्चय न झाल्यामुळे बुद्धीला व्यामोह पडून माणसांचा नाशही होतो. माणसे पराक्रमी असतात, त्यागी असतात, स्वाभिमानी असतात, दयाशील असतात. पण पराक्रम, त्याग, स्वाभिमान, दया कोठे दाखवावयाची याविषयी निश्चित कल्पना नसल्यामुळे हे गुण मातीमोल होतात व कित्येक प्रसंगी घातकही होतात. अधम, हीन, राष्ट्रद्रोही माणसांमुळे राष्ट्राचा घात